रस्त्यावरील निराधार पिडीत मनोरुग्णांना मायेचा आधार देऊन, सुरु असलेल्या पुनर्वसन कार्याची दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पाचे संस्थापक सचिव दिलीप गुंजाळ यांना पिंपरी चिंचवड (जि. पुणे) येथील वडार मजुर शिल्प प्रतिष्ठानच्या वतीने समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रस्त्यावर फिरणार्या निराधार पिडीत मनोरुग्णांना मायेचा आधार देऊन सांभाळ करुन त्यांच्यावर उपचार करुन पुनर्वसनासाठी कार्य करणार्या मानवसेवा प्रकल्पाच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन गुंजाळ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बर्ड वॅली उद्यान पिंपरी चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात गुंजाळ यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. कल्पनाताई शिंदे, अहमदनगर कारागृह अधिकारी सुवर्णाताई शिंदे, तळेगाव दाभाडेचे नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अनिल जाधव, पिंपरी चिंचवडच्या नगरसेविका वैशालीताई काळभोर आदी उपस्थित होते.
समाजाने नाकारलेल्या या निराधार पिडीत मनोरुग्णांच्या उपचार व पुनर्वसनासाठी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचा मानवसेवा प्रकल्प कार्य करीत असून, अनेक मनोरुग्णांना चांगले करुन त्यांना त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन करण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला पडलेली माणसं उचलून मानवसेवा पुनर्वसन केंद्रात आणायची, त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक उपचार करायचे, त्यांना बोलतं करून त्यांच्या घरचे, गावचे पत्ते मिळवायचे आणि पुन्हा त्यांना त्यांच्या कुटुंबात नेऊन सोडायचं, या पध्दतीने मानवसेवा प्रकल्पात निस्वार्थपणे कार्य सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन संस्थेचे सचिव गुंजाळ यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.