• Sat. Mar 15th, 2025

महिलांनी संसार सांभाळून व्यवसाय उभारावा -न्यायाधीश उषा पाटील

ByMirror

Oct 11, 2022

सावित्री ज्योती महोत्सव व बचतगट प्रदर्शनाचे उद्घाटन

अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांनी संसार सांभाळून आपला व्यवसाय उभारावा. व्यवसायात उभा करताना संसार सांभाळणे ही प्रथम जबाबदारी समोर ठेऊन आपल्या कला-गुणांना वाव द्यावे. व्यवसाय उभारल्यास कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळून संसाराचा गाडा व्यवस्थित चालणार असल्याचे प्रतिपादन धर्मदाय उपायुक्त तथा न्यायाधीश उषा पाटील यांनी केले.


सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सव व बचतगटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शन आणि विक्री स्टॉलच्या उद्घाटनाप्रसंगी न्यायाधीश पाटील बोलत होत्या. यावेळी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, सरकारी वकील अ‍ॅड. सुभाष भोर, अ‍ॅड. सुरेश लगड, शहर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष भुषण बर्‍हाटे, विशेष समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, शब्दगंध साहित्य परिषदेचे राजेंद्र उदागे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे पैठणे, रावसाहेब मगर, मेहेरबाबा ट्रस्टचे मेहेरनाथ कलचुरी, समाजकार्य महाविद्यालयाचे झारे, अमोल बागुल, अ‍ॅड. सुनिल तोडकर, जयश्री शिंदे, स्वाती बनकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


पुढे बोलताना न्यायाधीश पाटील म्हणाल्या की, कुटुंबात महिलांचे स्वातंत्र्य जपले गेले पाहिजे, बंधनात न अडकविता तिला भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. महिलांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सावित्री ज्योती महोत्सवाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रारंभी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन व वृक्षाला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात अ‍ॅड. महेश शिंदे यांनी महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजार पेठ मिळण्याच्या हेतूने व त्यांना प्रोत्साहन देण्याच्या भावनेने हा महोत्सव भरविला जात असून, यामध्ये अनेक सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमासाठी कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान नसून, लोकसहभागातून हा महोत्सव यशस्वी केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.


अ‍ॅड. सुरेश लगड म्हणाले की, समाजाची नाळ जोडलेला सावित्री ज्योती महोत्सव असून, या महोत्सवात बचत गटातील महिलांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. महिला सक्षम झाल्यास समाजाची प्रगती साधली जाणार असून, महिलांच्या कला-गुणांना सर्वांनी प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


चार दिवस चालणार्‍या या महोत्सवात जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ, समाजकल्याण विभाग, समाजकार्य महाविद्यालय, कासा संस्था, जिल्हा महिला व बालकल्याण विभाग, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, जय असोसिएशन ऑफ एन.जी.ओ. महाराष्ट्र राज्य, अहमदनगर महानगरपालिका, जिल्हा रूग्णालय आदींचा सहभाग आहे.


बचत गटाच्या प्रदर्शनात अकोल्याचे हातसडीचे तांदुळ, इंद्रायणी काळाभात तांदुळ, नाचणीची बिस्किट, विविध प्रकारचे जाम, पापड, चटण्या, लोणचे, मसाले, कर्जतची शिपी आमटी, गावराण तुप, उन्हाळी खाद्य पदार्थ, दिवाळी फराळ, अप्पे, वडे, सोयाबीन चिल्ली, थालपीटे, खपली गहू, मॅग्नेटिकची गादी, आवळ्याचे विविध पदार्थ, मेकअप साहित्य, कडधान्य, महिलांचे पर्स, गिफ्ट आर्टीकल्स, गॅझेट, ज्वेलरी, बांगड्या, खेळणी, परदेशात गाजललेले माठातले लोणचे आदींसह विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले आहे.


पाहुण्यांचे स्वागत पोपट बनकर यांनी केले. आभार अ‍ॅड. सुनील तोडकर महाराज यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. भास्कर रणनवरे, रमेश गाडगे, मेजर भिमराव उल्हारे, संजय गवारे, शाहीर कान्हू सुंबे, अश्‍विनी वाघ, रजनी ताठे, मिना म्हसे, दिनेश शिंदे, जयेश शिंदे, आरती शिंदे, स्वाती डोमकावळे, नयना बनकर, सुनिल गायकवाड आदी संस्था प्रतिनिधीनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *