इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी संघटनेची भ्रष्टाचारी सत्तापेंढार्यांना सत्तेतून पायउतार करण्याची मोहिम
स्वाध्याय डिच्चूफू इतरांनी करून भागणार नाही, तर प्रत्येक मतदाराला त्याची दीक्षा घ्यावी लागेल -अॅड. कारभारी गवळी
अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी संघटनेच्या पुढाकाराने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वाध्याय डिच्चूफू आंदोलन जारी करण्यात आले आहे. गीताभारत हा फक्त धर्मग्रंथ नसून, अखिल मानव जातीचा राजधर्मग्रंथ असल्याचे स्पष्ट करुन यावर आधारित हे आंदोलन असल्याचे अॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.
72 वर्ष देशात सार्वजनिक निवडणुका होतात. पहिल्या तीन-चार पंचवार्षिक योजनांमध्ये मतदारांनी चांगल्या उमेदवारांना मताधिक्याने निवडून दिले. कारण मोठ्या संख्येने उमेदवार हे स्वातंत्र्य लढ्यातील निस्पृ:ह नेते होते. मात्र गेली चाळीस वर्षे निवडणुकांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अनेक सत्तापेंढारी मतदारांना हजार-पाचशे रुपये देऊन मोठ्या संख्येने मतं खरेदी करतात. तर धर्माचा आणि जातीचा वापर निवडणुकांमध्ये सर्रास केला जातो. त्याचबरोबर मतदारांवर दहशत केली जाते. याचा परिणाम केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भ्रष्टाचारी सत्तापेंढारी यांनी मागच्या दाराने सत्ता मिळवून सरकारी तिजोरी घरी वाहून नेली. भ्रष्टाचार विरुद्ध कितीही आंदोलन केले तरी, त्याला यश आलेले नाही. त्याचे मुख्य कारण देशातील भ्रष्टाचार सत्तापेंढार्यांनी मागच्या दाराने मिळवलेली सत्ता आहे.
या देशातील मतदार भ्रष्टाचार सत्तापेंढार्यांच्या हातात सत्ता देऊन आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांचे नुकसान करून घेत आहेत. तात्पुरत्या कोंबडी, दारूच्या नादी लागून सत्तापेंढारी यांची गुट्टलबाजी यशस्वी झाली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर समाजातील लोकभज्ञाक उमेदवारांना निवडून दिले पाहिजे, तर गुटलबाज सत्तापेंढारी यांना डिच्चू देण्याचे आवाहन या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
गीताभारतामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला स्पष्ट रीतीने सत्याची बाजू घेण्यास सांगितले. या तत्त्वज्ञानावर आधारित हे आंदोलन आहे. कोणतीही गोष्ट सतत आणि वर्षानुवर्षी केल्याशिवाय तिला यश येत नाही. त्यामुळे मतदारांनी स्वाध्याय तंत्र स्वीकारले पाहिजे आणि त्यातून डिच्चूफू तंत्र अंतकरणात पक्के केले पाहिजे. त्यातून गुट्टलबाज सत्ता पेंढार्यांना सर्व निवडणुकांमध्ये सार्वजनिक जीवनातून कायमचे दूर करता येणार आहे. स्वाध्याय डिच्चूफू इतरांनी करून भागणार नाही, तर प्रत्येक मतदाराला त्याची दीक्षा घ्यावी लागेल. आणि त्याचा अंमल करावा लागणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्र दिनापासून स्वाध्याय डिच्चूफूआंदोलनासाठी संघटनेने प्रचार प्रसार सुरू करण्यात आला असून, हे आंदोलन व्यापक स्वरूपामध्ये राबविण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. यासाठी अॅड. गवळी, अशोक संब्बन, वीरबहादूर प्रजापती, विठ्ठल सुरम, कैलास पठारे, सुधीर भद्रे, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.