• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

महापरिनिर्वाण दिनाला 38 रेल्वे गाड्या रद्दचा तुघलकी निर्णय मागे घ्या

ByMirror

Nov 29, 2022

भिम पँथरची मागणी

आंबेडकर अनुयायींना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी द्वेषपूर्ण निर्णय -मतिन शेख

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाला (5 व 6 डिसेंबर) 38 रेल्वे गाड्या रद्द करण्याचा तुघलकी निर्णय मागे घेण्याची मागणी भिम पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन भिम पँथरचे दक्षिण जिल्हाध्यक्ष मतिन शेख यांनी नगर तहसिलला दिले आहे. हा निर्णय संतापजनक असून, याचा उद्रेक होण्यापूर्वी हा निर्णय मागे घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मतिन शेख


मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात जळगाव ते भुसावळ दरम्यानच्या तिसर्‍या व चौथ्या लाईनसाठी जळगाव स्थानकात यार्ड रिमॉडेलिंगचे काम सुरु करण्यात आले आहे. याकामासाठी जाणीवपुर्वक 5 व 6 डिसेंबर 2022 रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे हावडा ते मुंबई महामार्गावरील विदर्भ एक्सप्रेस व महाराष्ट्र एक्सप्रेससह अप व डाऊन अशा 38 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम पुढे ढकलून महापरिनिर्वाण दिनानंतर देखील केले जाऊ शकणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


संपूर्ण देशभरातील कानाकोपर्‍यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाला मुंबई येथील चैत्य भूमीवर बाबासाहेबाचे अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. याची जाणीव असताना रेल्वेच्या वतीने हा निर्णय घेवून आंबेडकर अनुयांयाना वेठीस धरण्याचा डाव आखण्यात आला आहे. सर्व गाड्या अकोला रेल्वे स्टेशन वरुन जाणार असल्यामुळे आंबेडकर अनुयायी व इतर प्रवाश्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी द्वेषपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष मतिन शेख यांनी केला आहे.


केंद्र सरकारने या निर्णयाचा पुर्नविचार करावा. आंबेडकर यांच्या अनुयांयाच्या भावनेशी खेळू नये. हा प्रकार सहन केला जाणार नसून, हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा. काही रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून, तेही सुरळित करण्याची मागणी भिम पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *