• Fri. Sep 19th, 2025

बेबीनंदा लांडे यांना रमाई गौरव पुरस्कार जाहीर

ByMirror

May 24, 2023

शहरात शनिवारी होणार्‍या रमाई चळवळीच्या साहित्य संमेलनात होणार पुरस्काराचे वितरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात होणार्‍या रमाई चळवळीच्या दहाव्या साहित्य संमेलनामध्ये माजी शिक्षिका बेबीनंदा सुभाष लांडे यांना या वर्षीचा रमाई गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती प्रा. डॉ. रेखा मेश्राम यांनी दिली.


टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात शनिवारी (दि.27 मे) रमाई चळवळीचे साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनामध्ये लांडे यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. बेबीनंदा लांडे यांनी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्य केले. त्यांनी पर्यवेक्षक पदाची जबाबदारी सांभाळून सेवानिवृत्त झाल्या.


शेवगाव येथे हायस्कूल व महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) या विद्यार्थी संघटनेत सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्‍नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला. 1983 मधे औरंगाबाद येथे झालेल्या विद्यार्थी युवकांच्या दहा दिवसांच्या शिबिरात सहभाग घेऊन विद्यार्थी युवकांच्या चळवळींशी त्यांचा संबंध आला. त्यांच्या आई सिंधुताई शिंदे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेवगाव ग्रामपंचायतच्या अनेक वर्षे सदस्य व पाच वर्षे उपसरपंच होत्या. डाव्या पुरोगामी लोकशाहीवादी चळवळींची पार्श्‍वभूमी असलेल्या बेबीनंदा यांनी हिंदी विषयाच्या राज्यस्तरीय प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील हिंदी भाषेतील शोध निबंधासाठी राष्ट्रीय पारितोषिक देखील मिळाला आहे.

तर 2022 चा जिल्हा गुणवंत हिन्दी अध्यापक पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व चळवळीतील कार्याची दखल घेऊन त्यांना रमाई गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *