अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी (पुणे) च्या वतीने शहरात समता सप्ताहातंर्गत पथनाट्यातून बार्टीच्या समतादूतांनी मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
शहरातील टिळक रोड, लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित युवा उद्योग व्यवसाय शिबिराच्या प्रारंभी पथनाट्याचे सादरीकरण झाले. पथनाट्यातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेवर प्रकाश टाकण्यात आला. या पथनाट्यमध्ये प्रेरणा विधाते, शुभांगी माने, रजत अवसक, एजाज पिरजादे, संतोष शिंदे, सुलतान सय्यद, रवींद्र कटके, वसंत बढे आदी समतादूत सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजामध्ये रूजविण्यासाठी व शासनाच्या कल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, समतादूत विभाग प्रमुख तथा उपायुक्त उमेश सोनवणे, प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे, बार्टीचे अहमदनगर जिल्हा समतादूत दिलावर सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले.