• Thu. Mar 13th, 2025

बारसूच्या रिफायनरी प्रकल्प विरोधात शहरात भाकपची निदर्शने

ByMirror

May 5, 2023

प्रकल्प रद्द करुन स्थानिक जनतेवरील दडपशाही थांबविण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- मनुष्यासह जैवविविधतेस धोकादायक असलेल्या प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्प विरोधात शहरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. रिफायनरी प्रकल्प रद्द करावे व बारसू परिसराच्या जनतेवरील दडपशाही थांबविण्याची मागणी करुन प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्प विरोधी समितीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात भाकपचे राज्य सचिव कॉ. अ‍ॅड. सुभाष लांडे, जिल्हा सचिव कॉ. अ‍ॅड. बन्सी सातपुते, सहसचिव कॉ. अ‍ॅड. सुधीर टोकेकर, फिरोज शेख, शेख अब्दुल गणी, सतिश पवार, अरूण थिटे, विनोद वारे, कन्हैय्या बुंदेले, विजय भोसले, प्रा. गणेश विधाते आदी सहभागी झाले होते.


केंद्र सरकारने राज्य सरकारच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू सोलगाव येथे सौदी अरेबियाच्या अरमॅको कंपनीच्या रिफाईनरी व पेट्रोकेमिकल्स संदर्भात प्रकल्प नियोजित केला आहे. या प्रकल्पामुळे मनुष्यासह जैवविविधतेस धोका असल्याने बारसू गावातील ग्रामस्थांनी विरोध करुन त्या विरोधात ग्रामपंचायतचा ठराव देखील घेतला आहे. या प्रकल्पाविरोधात प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्प विरोधी समितीने आवाज उठविला असून, हे आंदोलन दडपण्यासाठी समितीच्या सदस्यांना अटक देखील करण्यात आली आहे. संविधानाचे मुलभूत अधिकार पायदळी तुडवून राज्य व केंद्र सरकार दडपशाहीने प्रकल्प उभा करण्याचा घाट घातला असल्याचे भाकपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.


पर्यावरणाचा होणारा र्‍हास, स्थानिकांचा प्रचंड विरोध याचा विचार न करताच, अनेक कायदेशीर बाबींची पूर्तता झाली नसताना रिफाईनरीचा प्रकल्प पोलीसांचा प्रचंड फौजफाटा घेउन ग्रामस्थांवर लादण्यात येत असल्याचा आरोप भाकपच्या वतीने करण्यात आला आहे. बळजबरीने प्रकल्प लादण्याचा प्रयत्न होत असताना या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष देखील रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *