श्रेय घेण्यासाठी त्या लोकप्रतिनिधीने घाईघाईने कामाचे उद्घाटन उरकल्याचा आरोप
श्रेयाचे राजकारण जनता देखील खपवून घेणार नाही -अॅड. राजेश कातोरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- केलेल्या कामाचे श्रेय घेण्यास हरकत नाही, मात्र दुसर्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी घाईघाईने उद्घाटन करण्याचा प्रकार चूकीचा आहे. नागरिकांना काम करणारे लोकप्रतिनिधी सर्वश्रृत असून, श्रेयाचे राजकारण जनता देखील खपवून घेणार नसल्याचे प्रतिपादन नगरसेवक अॅड. राजेश कातोरे यांनी केले.
नागापूरला आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या अंगणवाडीच्या दोन शाळा खोल्यांच्या बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी नगरसेवक कातोरे बोलत होते. याप्रसंगी लहानुभाऊ भोर, लक्ष्मण कातोरे, बाबासाहेब पवार, आसाराम कातोरे, राजेंद्र सप्रे, नामदेव वाघ, अंतोन गायकवाड, संदेश भाकरे, चंद्रकांत काळे, राहुल कातोरे, अॅड. गणेश कातोरे, शिवराम गांगोले, महेश राऊत, पोपट भाकरे, रंजना भाकरे, सनफार्मा कंपनीचे श्रीनिवास न्यालपेल्ली, सोमनाथ तडस, सचिन बारस्कर, मुकेश पाटोळे, मनिष भाकरे आदींसह नागरिक उपस्थित होते.
पुढे नगरसेवक कातोरे म्हणाले की, मुलांच्या भवितव्याचा विचार करुन उभे राहत असलेल्या अंगणवाडीच्या कामात राजकारण होवू देणार नाही. आर्थिक दुर्बल घटक असलेल्या सर्वसामान्यांची मुले या अंगणवाडीत शिकणार असून, हे काम दर्जेदार करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात अंतोन गायकवाड म्हणाले की, पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या नागापूरच्या अंगणवाडीची मोठी दुरावस्था झाली होती. मुलांना अंगणवाडीत शिकण्यासाठी मोठी अडचण येत असताना नगरसेवक अॅड. राजेश कातोरे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत महापालिकेतून अंगणवाडी व सन फार्मा कंपनीकडून आर्थिक सहयोग मंजूर करुन घेतले. मात्र विरोधकांनी श्रेय लाटण्यासाठी घाईघाईने उद्घाटन उरकल्याचा आरोप त्यांनी केला.
नागापूरच्या सिटी सर्व्हे नंबर 709 मध्ये अंगणवाडी मंजूर झाली होती. मात्र ही जागा कामगार तलाठी कार्यालयासाठी आरक्षित असल्याने नगरसेवक कातोरे यांनी आमदार जगताप यांच्या माध्यमातून महापालिकेकडे पाठपुरावा करुन सिटी सर्व्हे नंबर 718 मध्ये अंगणवाडी मंजूर करुन घेतली. तर दोन खोल्या उभारण्यासाठी सन फार्मा कंपनीकडून आर्थिक सहयोग देखील मिळवला. मात्र राजकारणासाठी याचे श्रेय घेण्यास भलतेच लोकप्रतिनिधी आयत्या कामावर रेखोट्या मारण्यासाठी हजर झाल्याचे संदेश भाकरे यांनी सांगितले.