सैनिक समाज पार्टीच्या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी व्युव्हरचना
अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार व वंशवादमुक्त राजकारणासाठी सर्वसामान्य मतदारांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रस्थापित घराणेशाही, गुंड प्रवृत्ती व भ्रष्ट नेत्यांमुळे सर्वसामान्यांचे प्रश्न न सुटता, सत्ताधारी फक्त आपले हित साधत आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका महत्त्वाच्या असून, या निवडणुकीत सैनिक समाज पार्टी पुर्ण ताकतीने उतरणार असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष अॅड. शिवाजीराव डमाळे यांनी केले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सैनिक समाज पार्टीच्या वतीने शहरातील पार्टी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्षीय भाषणात अॅड. डमाळे बोलत होते. याप्रसंगी रावसाहेब काळे, दीपक वर्मा, अरुण खिची, भाऊसाहेब भुजबळ, तुषार औटी, सुभेदार आंधळे, प्रमोद चुंबळकर, मुस्ताक वस्ताद, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शिंदे, अॅड. स्वाती गायकवाड, अॅड. भावना पांढरे, अॅड. पल्लवी डमाळे, अॅड. संदीप डमाळे, अंजुम पठाण, अनिता वेताळ आदी उपस्थित होते.
पुढे अॅड. डमाळे म्हणाले की, आजच्या भ्रष्ट, गुंडशाही प्रस्थापितांविरोधात सैनिक समाज पार्टी लढणार आहे. नागरिकांनी देखील कोणत्याही प्रकारच्या दबावाला व अमिषाला बळी न पडता लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे जावे. समाजातील प्रामाणिक कार्यकर्ते पक्षाशी जुडत आहे. नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जात असून, उच्चशिक्षित नागरिकांनी पक्षाबरोबर येऊन लोकशाही मजबूत करण्यासाठी आपले योगदान देण्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकित सैनिक समाज पार्टीची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी रणनीती ठरविण्यात आली. पाच ते दहा वर्षात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने कमवलेल्या कोट्यावधीच्या संपत्ती ही सर्वसामान्यांच्या खिशावर मारलेला डल्ला असून, अशा उमेदवारांना खड्या सारखे बाजूला करण्याचे आवाहन करण्यात आले. तर पक्षाची ध्येय-धोरण सर्वसमान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी तालुकास्तरावर बैठकिचे नियोजन करण्यात आले.