छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवल्यास समाज गुण्यागोविंदाने नांदेल -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करुन, समाजात समता व एकात्मता प्रस्थापित केली. एक आदर्शवादी राज्याची निर्मिती करुन धार्मिक व सामाजिक एकोपा कसा ठेवावा व महिलांचा सन्मान कसा राखावा? याचे आदर्श त्यांनी घालून दिले. मात्र सध्या त्यांचे आदर्श व विचारापासून दुरावल्या गेल्याने समाजात द्वेष व मत्सर वाढत असून, महाराजांचा आदर्श समोर ठेवल्यास समाज गुण्यागोविंदाने नांदेल असा विश्वास प्रा. माणिक विधाते यांनी व्यक्त केला.
जुन्या बसस्थानका जवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे विश्व हिंदु मराठा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली युवा शिवव्याख्याती प्रणाली कडूस हिच्या पुढाकाराने दर रविवारी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची महापूजा व स्वच्छता अभियान सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची आरती करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी गणेश बोरुडे, लहू कराळे, मारुती पवार, निखिल खामकर, महेश आनंदकर, प्रा. मोहिते, प्रशांत दरंदले, अशोक घटगळ, डॉ. बाबासाहेब कडूस, सुनिल कोळगे, योगिता कोळगे, तेजस्वि दरंदले, सृष्टी कोळगे, स्वाती कडूस, अपेक्षा कुकरे, विनायक डांगे आदी उपस्थित होते.
शिवव्याख्याती प्रणाली कडूस म्हणाली की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार भावी पिढीमध्ये रुजविण्यासाठी व त्यांच्या ज्वाजल्य इतिहासामधून प्रेरणा घेण्यासाठी दर रविवारी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महापूजेचा उपक्रम सुरु आहे. या कार्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे विशेष सहकार्य मिळत असून, शिवभक्तांना दर रविवारी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.