शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर केडगावच्या विश्वेश्वर प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उद्योजक गणेश सातपुते यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आले. मल्हार लॉन येथे एकल महिला पुनर्वसन समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक कुटे व तालुकाध्यक्ष प्रकाश इथापे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी बाप्पू सांगळे, दिगंबर कर्डिले, धनेश कोठारी, तालुकाध्यक्ष प्रकाश इथापे, संतोष कोतकर, सुनील लोंढे, योगेश कुमठेकर, नवनाथ गहिले, सोमनाथ सातपुते आदी उपस्थित होते.
अशोक कुटे म्हणाले की, शिक्षणाने दशा बदलून जीवनाला दिशा मिळते. कोरोनाने अनेकांचे मातृ-पितृ छत्र हरपले. अनेकांचे संसार उघड्यावर येऊन त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विश्वेश्वर प्रतिष्ठानने शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असून, विद्यार्थ्यांनी चौफेर नजर ठेऊन संधीचे सोने करावे. आवड असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धेला सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले.
गणेश सातपुते यांनी विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजूंना आधार देण्याचे कार्य सुरु आहे. कोरोना काळात अनेकांची मदत करण्यात आली. कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन त्यांच्या भविष्यातील शिक्षणाचा प्रश्न सोडविण्याचा संकल्प विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमास उद्योजक सचिन कोतकर, नगरसेवक मनोज कोतकर, उद्योजक जालिंदर कोतकर, भूषण गुंड, डॉ. प्रसाद आंधळे, गुलाबराव पवार, विजू कराळे, राजू आंग्रे, नवनाथ गहिले, योगेश डोंगरे, विशाल सकट यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.