• Thu. Oct 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

बिरोबा देवस्थानच्या होईकात पुढील वर्षी देखील दुष्काळाचे सावट; भूगर्भातील जलसाठे आटण्याचे भाकीत!

ByMirror

Oct 29, 2026
निमगाव वाघा येथे पारंपरिक होईक सोहळा; पाऊस, शेती आणि पशुधनाविषयी व्यक्त केली चिंता

निमगाव वाघा येथे पारंपरिक होईक सोहळा; पाऊस, शेती आणि पशुधनाविषयी व्यक्त केली चिंता


‘काळी आईची वाफ होईल’; निमगाव वाघ्याच्या होईकात आगामी संकटांचे संकेत देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी मांडली पारंपरिक भविष्यवाणी


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील प्रसिद्ध बिरोबा देवस्थान येथे पारंपरिक धार्मिक प्रथेप्रमाणे नुकताच होईक (भविष्यवाणी) सोहळा पार पडला. या वेळी देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी आगामी काळातील पाऊस, शेती, पशुधन आणि भूगर्भातील जलसाठ्यांबाबत पारंपरिक भाकीत मांडले. ‘काळी आईची वाफ होईल’, म्हणजेच दुष्काळाची तीव्रता कायम राहून जमिनीतील पाणीसाठे कमी होण्याची शक्यता असल्याचे संकेत होईकातून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. आगामी काळात पाच ते सात खंडांमध्ये परिस्थिती कठीण होण्याचे भाकीतही यावेळी करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यास पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बिरोबा देवस्थान येथे झालेल्या होईकात पावसाचे अनिश्‍चित स्वरूप, शेतीसमोरील आव्हाने आणि पशुधनावरील संकट यांचा उल्लेख करण्यात आला. तीन खंडांत आभाळ फिरेल, मात्र काही ठिकाणी पाऊस होईल तर काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम राहील, असे पारंपरिक भाकीत सांगण्यात आले. यामुळे पेरणी, पिकांची वाढ आणि ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.
शेती आणि पशुधनाला संकटाचा सामना करावा लागू शकतो, असेही होईकात सांगण्यात आले. ‘लक्ष्मी’चा उल्लेख पशुधन आणि शेतीच्या संदर्भात करण्यात आला. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा अर्थ या भाकितातून व्यक्त करण्यात आला.


ज्वारीची पेरणी होण्याचे संकेत देतानाच मुगाच्या पेरणीचा मार्ग कठीण राहील, असेही सांगण्यात आले. दिवाळीच्या सुमारास तसेच पुढील काही कालखंडांत काही भागांत पाऊस होण्याची शक्यता असल्याचे पारंपरिक भाकीत मांडण्यात आले. मागील वर्षी दहा खंडांत चळवळ होण्याचे भाकीत करण्यात आले होते. सध्या विविध क्षेत्रांत आंदोलन आणि चळवळी सुरू असल्याने त्या भाकिताची ग्रामस्थांमध्ये चर्चा होत असल्याचे सांगण्यात आले. तसेच सोन्याच्या भावात मोठी वाढ होण्याबाबत केलेले भाकीतही खरे ठरल्याचा दावा उपस्थितांकडून करण्यात आला.


यंदाच्या होईकात आगामी काळातील अडचणी, पावसाची अनिश्‍चितता आणि काही विनाशकारी घटनांचे संकेत दिल्याचे सांगण्यात आले. ‘दिनमान काळा होईल’, या उल्लेखातून आगामी काळात अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर सत्याचा विजय होईल, असेही भाकीत मांडण्यात आले.
देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी होईक सांगताना पारंपरिक विधी केला. त्यांच्या अंगात वारे संचारल्यानंतर त्यांनी स्वतःच्या अंगावर वेताचे फटके ओढत भविष्यवाणी सांगितली. सकाळी बिरोबाच्या ओव्या सादर करण्यात आल्या. गावातील पशुहत्याबंदीच्या परंपरेचे पालन करून देवाला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला.


निमगाव वाघा येथील बिरोबा देवस्थानच्या होईक सोहळ्याला परिसरात पारंपरिक महत्त्व आहे. दरवर्षी या सोहळ्याच्या निमित्ताने पंचक्रोशीतील ग्रामस्थ एकत्र येतात. होईक ऐकण्यासाठी आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यासाठी यंदाही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.


या होईक सोहळ्याच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, नामदेव जाधव, बाबासाहेब जाधव, गोकुळ जाधव, साहेबराव बोडखे, बबन कापसे, बाबा जाधव, बाबा पुंड, अंशाबापू शिंदे, संजय डोंगरे, संजय कापसे, ठकाराम शिंदे, बाळू भुसारे, युवराज भुसारे, पांडुरंग गुंजाळ, राजू भुसारे, अंबादास निकम, कचरू कापसे, भागचंद जाधव, विजय भुसारे, रामदास वाखारे, गुलाब जाधव, गणेश भुसारे, सुरेश जाधव, अण्णा जाधव, नवनाथ जाधव, अतुल फलके, राजेंद्र डोंगरे, अरुण कापसे, रावसाहेब भुसारे आदींनी सहभाग घेतला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *