पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्यासमोर रंगला आनंदोत्सव
महागाई, जाती-धर्मातील द्वेष, बेरोजगारीच्या प्रश्नांना कर्नाटकच्या जनतेने निवडणुकीतून योग्य उत्तर दिले -दीप चव्हाण
अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्नाटकातील भाजपची सत्ता उलथवून काँग्रेसने मिळविलेल्या विजयाचा शहरात काँग्रेसच्या निष्ठावान पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्यासमोर व अप्पूहत्ती चौकात हातात काँग्रेसचे ध्वज घेऊन विजयाच्या घोषणा देत आनंदोत्सव रंगला होता. मोदी हटाव देश बचावच्या…. घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाल्यानंतर शहरात हा जल्लोष करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव दीप चव्हाण, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भंडारी, जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, नगरसेवक आसिफ सुलतान, श्यामराव वाघस्कर, निजाम जहागीरदार, मयूर पाटोळे, रिजवान शेख, सागर इरमल, नलिनी गायकवाड, जरीना पठाण, अकदस शेख, शहेबाज बेग, अश्फाक सय्यद, राजूभाई शेख, तनवीर पठाण, सुनीता बागडे, मार्गरेट जाधव, ईशरज शेख, भूषण चव्हाण, नईम सरदार, संजय झोडगे, संजय खडके, इम्रान बागवान आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दीप चव्हाण म्हणाले की, काँग्रेसने कर्नाटकमध्ये बहुमत सिद्ध करुन हुकूमशाही राजवटीला शह दिला आहे. देशातील महागाई, जाती-धर्मातील द्वेषाचे राजकारण, सुशिक्षित युवकांचे बेरोजगारीच्या प्रश्नांचे कर्नाटकच्या जनतेने भाजपला निवडणुकीतून योग्य उत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी काढलेल्या पदयात्रेचे तसेच काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते व कर्नाटकातील पक्षाचे पदाधिकारी व जनतेचा हा खरा विजय आहे. भाजपच्या भावनिक राजकारणांना बळी न पडता जनतेने काँग्रेसला साथ दिली आहे. उत्तर भारत, महाराष्ट्र आदी ठिकाणी फोडाफोडीचे राजकारण करून भाजपने मिळवलेली सत्ता, हे जनतेच्या लक्षात आल्याने जनतेने बहुमताने काँग्रेसला निवडून दिले आहे. काँग्रेस ही विचारधारा असून, कोणाची मक्तेदारी नसून, निष्ठावंत काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केला असल्याचे त्यांनी सांगितले.