सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने राजीनामा देण्याची भाकपची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्नाटकच्या मतदारांनी भाजपचा दारुण पराभव करून धार्मिक ध्रुवीकरण व द्वेषाचे राजकारण नाकारले आहे. येणार्या सर्व निवडणुकांमध्ये काय घडणार याचे उदाहरण घालून दिले असल्याची प्रतिक्रिया भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अॅड. सुभाष लांडे यांनी व्यक्त केली. तर कर्नाटकच्या जनतेचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्या वतीने अभिनंदन व्यक्त करुन महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने राजीनामा देण्याची मागणी भाकपच्या वतीने करण्यात आली आहे.

नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षातील निकाल देताना राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन असंवैधानिक पध्दतीने व्यवहार केला. हे स्पष्ट केले व भाजपाच्या लोकशाही विरोधी वर्तवणूकीवर ताशेरे ओढले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गटाने काढलेल्या व्हिपला कायदेशीर मान्यता दिली आहे. याबाबत विधानसभा अध्यक्षाने लवकरात लवकर 16 विधानसभा सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा असे आदेश दिले आहेत. उध्दव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी भाजप ने सर्व नितीमत्ता आणि संवैधानिक तरतुदी पायदळी तुडवून सत्ता हस्तगत केली आहे. हे आता न्यायालयाने देखील स्पष्ट केले असल्याचे कॉ. लांडे यांनी म्हंटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या निवाड्याच्या आधारे आणि कर्नाटकच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर या महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस भाजपा सरकारने धडा घेऊन नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. राज्यात नव्याने निवडणुक घेवून नवा जनादेश स्थापित करुन राज्यात स्थिर सरकार सत्तेवर यावे. ही राज्यातील सर्व सामान्य जनतेची तीव्र इच्छा आहे. त्यास प्रतिसाद दिला पाहिजे. थोडी नितीमत्ता असेल तर शिंदे फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा व निवडणुकीला सामोरे जावे. अन्यथा महाराष्ट्रात कर्नाटक पेक्षाही दारूण पराभव राज्यातील जनता करेल, असे कॉ. अॅड. लांडे यांनी म्हंटले आहे.