• Thu. Mar 12th, 2026

एमआयडीसी, बोल्हेगाव, नागपूर भागातील अवैध धंदे बंद करावे

ByMirror

Nov 15, 2022

रिपाई महिला आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

अवैध धंद्यामुळे महिलांचे संसार उध्वस्त होऊन मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाचा प्रश्‍न बिकट

अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी, बोल्हेगाव, नागपूर भागातील जुगार, मटका, हातभट्टी, दारू, गांजा आदी अवैध धंद्यामुळे महिलांचे संसार उध्वस्त होऊन मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाचा प्रश्‍न बिकट बनत असताना त्वरीत अवैध धंदे बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी रिपाई महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ज्योती पवार, बबई वाघमारे, मंगल चांदणे, शोभा मिरपगार, सोनाली पवार, संगिता पाटोळे, सुवर्णा पाटोळे, मैनाबाई शिंदे, सुशिला भाकरे, सुमन भाकरे आदी उपस्थित होते.
एमआयडीसी, बोल्हेगाव, नागपूर भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले असून, राजरोसपणे सुरू आहे. अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत चालले आहे. या जुगारसाठी पुरुष मंडळी काम न करता सर्वकाही गहाण ठेऊन डाव लावत आहे. तर युवक देखील व्यसनाच्या आहारी जात आहे. कुटुंबातील अनेक मुला-मुलींचे शिक्षण धोक्यात आले आहे. तर महिलांचा संसार उघड्यावर आला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


अवैध धंद्यामुळे अनेक कुटुंबीय कर्जबाजारी झाले असून, महिलांना या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हातभट्टी, दारू, गांजा यांमुळे आरोग्य देखील धोक्यात आले असून, महागाईमुळे व्यसन करणार्‍यांवर उपचार करणे देखील अवघड बनले आहे. अवैध धंद्यामुळे कुटुंबातील महिला व मुलांवर उपासमारीची वेळ आली असून, याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रिपाई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. त्वरीत एमआयडीसी, बोल्हेगाव, नागपूर भागातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी रिपाई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *