भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षक पुरस्काराने सन्मान
शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मखदुम एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटी, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद व रहेमत सुलतान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका श्रीमती शेख फरहत अंजुम अब्दुल समद यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
भारताचे पहिले शिक्षणमंत्री व थोर स्वातंत्र्यसेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात राष्ट्रीय कौमी एकता सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शेख फरहत अंजुम यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्जेपूरा येथील रहेमत सुलतान सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी अँग्लो उर्दू हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजचे (संगमनेर) चेअरमन शेख गनी हाजी भाई अब्दुल हसन चौधरी, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, मखदुम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आबिद दुल्हेखान, डॉ. कमर सुरुर, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सलीम खान पठाण, मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष भैरवनाथ वाकळे, सचिव युनूसभाई तांबटकर आदी उपस्थित होते.
शेख फरहत अंजुम यांनी जि.प. शाळा, निंबाळे (ता. संगमनेर) येथे 1994 साली सेवेला प्रारंभ केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. त्यांनी राबविलेल्या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढून विद्यार्थी संख्या देखील वाढली. विविध ठिकाणी शिक्षण क्षेत्रात कार्य करताना गुणवत्तापूर्ण शिक्षणाने त्यांनी विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले. लांबच्या विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी स्वखर्चाने रिक्षाची व्यवस्था केली. तर कनगर (ता. राहुरी) येथील बंद पडण्यास आलेली शाळा त्यांनी विद्यार्थी संख्या वाढवून वाचवली. घोडेगाव येथे कार्यरत असताना ग्रामस्थांशी संवाद साधून शाळेच्या वर्ग खोल्यांचे काम मार्गी लावले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अद्यावत शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या. या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या भाग्योदय विद्यालय, भोयरे पठार (ता. नगर) चे मुख्याध्यापक हबीब चाँदभाई शेख यांच्या पत्नी आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
