पक्षाचा आदेश डावलून इतर पक्षाकडून उमेदवारी केल्याने कारवाई
शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांची माहिती
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाविरोधात शिस्तभंगाची कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख आकाश कातोरे व युवा सेना शहरप्रमुख महेश लोंढे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
शिवसेना पक्षात अधिकृत पदावर कार्यरत असताना, महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात इतर पक्षाकडून उमेदवारी दाखल करून त्यांनी पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. संबंधित दोन्ही पदाधिकाऱ्यांची तात्काळ पदनियुक्ती रद्द करण्यात येत असून त्यांना शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे अनिल शिंदे यांनी सांगितले.
पक्षविरोधी कारवाया कोणत्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत. भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाप्रमुख शिंदे यांनी दिला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची अधिकृत भूमिका, उमेदवार आणि निर्णय यांच्याशी प्रामाणिक राहणे हे प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याचे कर्तव्य असून, पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांसाठी शिवसेनेत स्थान नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
