रिपब्लिकन युवा सेनेचे उपोषण स्थगित
कंपनीची फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- कमीत कमी काळावधीत जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या सुपा (ता. पारनेर) येथील सीस पे फिनोवेल्थ इंडिया (एलएलपी) कंपनीची चौकशी करण्याच्या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनी रिपब्लिकन युवा सेनेचे उपोषण सुपा पोलीस स्टेशनच्या लेखी आश्वासनाने स्थगित करण्यात आले. कंपनी व्यवस्थापक तसेच पदाधिकारी यांना सुपा पोलीस स्टेशनला बोलवून त्या कंपनीच्या कागदपत्राची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. सदर लेखी पत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा संघटक मेहेर कांबळे यांना दिले.
सीस पे फिनोवेल्थ इंडिया (एलएलपी) कंपनीने बँकेपेक्षा अधिक व्याजदर देण्याचे आश्वासन देत मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या ठेवी घेतलेल्या आहेत. सदर कंपनी बंद पडण्याच्या अगोदर कंपनीची फॉरेन्सिक ऑडिट तज्ञ सीए यांच्या माध्यमातून करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
कंपनीने अनेक शेतकरी व कामगार वर्गांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी घेतलेल्या आहेत. अनेकांनी कर्ज काढून तर आपल्या जीवनाची पूंजी या कंपनीत गुंतवली आहे. कोट्यावधीचा टर्न ओव्हर असलेल्या या कंपनीच्या शासकीय नोंदणीचे दाखले, कंपनीच्या सेबी आणि ए.एम.एफ.आय. कडील नोंदणीचे दाखले, कंपनीच्या मालकांच्या तपशील कागदपत्रासह, कंपनीच्या मागील तीन वर्षाचा इन्कम टॅक्स, ताळेबंद, ऑडिट रिपोर्ट, मागील वर्षाचे बँक स्टेटमेंट याची चौकशी करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
कंपनी गुंतूनदारांना अवास्तव परताव्याची आश्वासन देते, तो परतावा देण्यासाठी कंपनी कोणता व्यवसाय करते त्याचे पुराव्यास स्पष्टीकरण गुंतवणूकदारांना मिळण्याची गरज आहे. कंपनी परतावा देताना व गुंतवणुक करताना कोणत्याही प्रकारचा दस्तावेज गुंतवणूकदारांना दिला जात नसल्याचे म्हंटले आहे.