फसवणुक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची भिंगारदिवे परिवाराची मागणी
व्यसनाचा गैरफायदा घेत दुय्यम निबंधकांना हाताशी धरून जागा नावावर केल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- माळीवाडा भागातील वर्ग 2 मिळकत वर्ग 1 मध्ये हस्तांतरीत करुन देण्याचे भासवून, व्यसनाधिनतेचा गैरफायदा घेत सदर मिळकती पोटी कोणताही आर्थिक लाभ न देता स्वत:च्या नावावर करुन घेणाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी भारत भागचंद भिंगारदिवे व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी भिंगारदिवे कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई) शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
माळीवाडा भागातील सर्व्हे नंबर 9/2 हे 52 आर क्षेत्राची मिळकत भारत भिंगारदिवे यांच्या वडिलोपार्जित मालकी हक्क, कब्जा, वहिवाटेची होती. या मिळकतीवर त्यांचे वडील भागचंद भिंगारदिवे यांची नोंद होती. त्यांच्या मृत्यूनंतर सदर मिळकतीस आई, भाऊ, बहीण यांच्या नावाची वारस हक्काने नोंद लागलेली होती. सदरची मिळकत ही महाराष्ट्र शासनाकडून त्यांचे पूर्वजांना वर्ग 2 म्हणून मिळालेली असल्याने सदर मिळकतीचे कोणत्याही प्रकारचे विक्री, विल्हेवाट अगर हस्तांतर करता येत नाही. सदर मिळकतीस विकसित करावयाची असल्याने मिळकत वर्ग दोन मधून एक मध्ये हस्तांतरित करून घ्यावी लागत होती. त्याकरिता सर्व अर्जदार वेळोवेळी शासकीय कार्यालयात एकत्रितपणे ये-जा करू शकत नसल्याने ही मिळकत भारत भागचंद भिंगारदिवे यांच्या नावाने मुख्त्यारपत्र करुन दिले. सदर मिळकतीचे विकसन वर्ग 2 मधून 1 मध्ये करण्याचे हक्क अधिकार दिलेले होते.
दरम्यानच्या काळात दारुचे व्यसन लागल्याने भिंगारदिवे यांनी सदर मिळकतीचे विकसन वर्ग 1 मध्ये रुपांतर करता आले नाही. याचा गैरफायदा घेऊन वसीम तांबोळी, राजाराम नलावडे व रमजान तांबोळी यांनी वेळोवेळी संपर्क करून सदर मिळकतीचे विकसन वर्ग 1 मध्ये करुन देण्याचा विश्वास दिला. त्यांच्यावर विश्वास ठेवून भिंगारदिवे यांनी त्यांना मुख्त्यारपत्र देण्याची तयारी दर्शवली. मात्र जुलै 2013 मध्ये संबंधितांनी त्यांना दुय्यम निबंधक कार्यालयात घेऊन जावून दस्तावर सह्या व संमती घेतली. 2018 मध्ये व्यसनातून बाहेर पडल्यावर त्यांना याबाबत विचारल्यास संबंधीतांनी सदर काम सुरु असल्याचे स्पष्ट केले. सदरचे काम होत नसल्याने कुटुंबीयांनी सन 2022 मध्ये सातबारा उतारे काढले असता सदर मिळकतीच्या सातबारावर वर्ग 1 मध्ये रुपांतर करुन देण्याचे आश्वासन देणाऱ्यांची नावे लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकाराबाबत संबंधीत व्यक्तींकडे विचारणा केली असता, त्यांनी चूक मान्य करून सदरची मिळकत पुन्हा नावावर करून देणार असल्याची खात्री दिली व त्यांच्यावर विश्वास ठेवून या प्रकाराची तक्रार करण्यात आली नाही. मात्र यामधील राजाराम नलावडे मयत झाल्याने त्यांच्या वारसांची नावे सातबारावर लागल्याने फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
मुख्त्यारपत्र करुन घेण्याच्या नावाने व्यसनाचा गैरफायदा घेत संबंधीत व्यक्तींनी दुय्यम निबंधकांना हाताशी धरून वर्ग 2 ची मिळकत स्वत:च्या नावावर करुन घेतली असल्याचा आरोप भिंगारदिवे यांनी केला आहे. त्या मोबदल्यात कोणतीही आर्थिक रक्कम देण्यात आलेली नाही. बनावट व बेकायदेशीर खरेदी खताने वर्ग 2 ची मिळकत हस्तांतरित करून फसवणुक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भिंगारदिवे परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.