• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

भोयरे पठार येथील भाग्योदय विद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा

ByMirror

Jul 19, 2025
विद्यार्थ्यांना विविध कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांना विविध कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन


शिक्षणासोबत कौशल्ये आत्मसात केल्यास स्पर्धात्मक युगात टिकता येणार आहे -पै. नाना डोंगरे

नगर (प्रतिनिधी)- मेरा युवा भारत व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने नगर तालुक्यातील भोयरे पठार येथील भाग्योदय विद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना जीवनात विविध कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन करुन त्याचे महत्त्व विशद करण्यात आले.


स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी निमगाव वाघाचे ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक हबीब शेख, उपमुख्याध्यापक शिवाजी धस, संजय गोसावी, भरत लगड, सतीश मुसळे, रामदास साबळे, सुनीता दिघे, मनीषा वाटोळे, अशोक टकले, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, युवकांचा देश असलेल्या भारतात तरुणांमध्ये कौशल्यविकासाची जाणीव निर्माण करणे महत्त्वाचे आहे. कौशल्य आत्मसात करुन युवा वर्ग सशक्त होणार आहे. कौशल्य केवळ पुस्तकी ज्ञान नसून, व्यवहारातील उपयोगी ज्ञान आहे. शालेय शिक्षणासोबत कौशल्ये आत्मसात केल्यास स्पर्धात्मक युगात टिकता येणार आहे. वाढत्या लोकसंख्येनेमुळे नोकऱ्यांचे प्रमाण कमी असल्याने बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी त्यांना विविध व्यावसायिक कौशल्य निर्माण करण्यासाठी शासनाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.


उपमुख्याध्यापक शिवाजी धस म्हणाले की, स्वावलंबन, रोजगारनिर्मिती आणि उद्यमशिलता यासाठी कौशल्य अनिवार्य आहे.जग झपाट्याने बदलते आहे, पारंपरिक नोकऱ्यांपेक्षा कौशल्याधारित रोजगारांची गरज वाढत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मध्ये देखील कौशल्य शिक्षणाला महत्त्व दिले गेले आहे. शालेय जीवनातच विविध उपक्रम, स्पर्धा, कार्यशाळा यामधून नवीन कौशल्ये शिकण्यासाठी संधी निर्माण झाली आहे. डिजिटल टूल्स वापरा, ऑनलाईन कोर्सेस, यूट्यूब, स्किल इंडिया यांसारख्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्याध्यापक हबीब शेख यांनी शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजित संतोष, रमेश गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *