• Thu. Apr 24th, 2025

निमगाव वाघात जागतिक क्षयरोग दिवस साजरा

ByMirror

Mar 26, 2025

विद्यार्थ्यांनी रॅलीतून क्षयरोग प्रतिबंधात्मकतेची केली जागृती

क्षयरोगाला पूर्णत: नियंत्रणात आणण्यासाठी भावी पिढीचे योगदान महत्त्वाचे ठरणार -पै. नाना डोंगरे

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे श्री नवनाथ विद्यालयात नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने जागतिक क्षयरोग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये क्षयरोग प्रतिबंधक मोहिमेची माहिती देण्यात आली. क्षयरोग आजाराबाबत ग्रामस्थांमध्ये जागृती होण्यासाठी विद्यार्थ्यांनी रॅली काढली होती.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शिवानी कुलकर्णी, आरोग्य सेविका अश्‍विनी झावरे, मंदा साळवे, प्रमोद थिटे, तेजस केदारी, तृप्ती वाघमारे, आरोग्यसेवक एम.के. गायकवाड, भानुदास लंगोटे, प्रशांत जाधव, निकिता रासकर, लहानबा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, रेखा ठोंबरे, अलका कैतके आदींसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


डॉ. शिवानी कुलकर्णी यांनी क्षयरोग प्रतिबंध करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, आधुनिक वैद्यकिय शास्त्रातील निदान व उपचारामुळे आज क्षयरोग पुर्णतः बरा होतो. 15 ते 55 वर्षे या वयोगटातील व्यक्तींना हा आजार होतो. या आजाराने ग्रासलेले रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. क्षयरोग नियंत्रणात आणण्यासाठी लोकसहभाग आणि आरोग्य शिक्षण हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. क्षयरोगाचा संसर्ग दुसऱ्या निरोगी व्यक्तीस होऊ नये, याची खबरदारी घेणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.


पै. नाना डोंगरे यांनी क्षयरोग प्रतिबंधासाठी जागृती हा सर्वोत्तम मार्ग आहे. यासाठी सामाजिक संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे. क्षयरोगाला भारतामध्ये पूर्णत: नियंत्रणात आणण्यासाठी भावी पिढीचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्ला, वरिष्ठ लेखापाल सिध्दार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *