मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक बळ मिळणार – शेख नसीम खान
भारतीय डाक विभागाच्या सहकार्याने मुलींसाठी खातेउघडणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लहान मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या शिक्षण व लग्नाच्या खर्चासाठी सक्षम आर्थिक आधार तयार करण्याच्या उद्देशाने माजी नगरसेविका तथा महिला-बालकल्याण समितीच्या माजी सभापती शेख नसीम खान यांच्या पुढाकाराने मुकुंदनगर परिसरात भारतीय डाक विभागामार्फत सुकन्या समृद्धी योजना खातेउघडणी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा मोठ्या संख्येने स्थानिक महिलांनी लाभ घेतला.
केंद्र शासनाने राबविलेल्या या योजनेचा लाभ सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना सहज मिळावा, आर्थिक बचत संस्कृती रुजावी आणि मुलींच्या भविष्यासाठी सुरक्षित राखीव निधी उभा राहावा, यासाठी शेख नसीम खान यांनी स्वतः खाती उघडून दिली. वरिष्ठ डाक अधीक्षक विकास पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. या प्रसंगी डाक विभागाचे सदाफुले, रामेश्वर ढाकणे, पोस्टमन जीवन गजभिये, विनायक सोनवणे, हर्ष कांबळे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी जागेवरच सुकन्या समृद्धी योजनेचे अर्ज भरले. तसेच डाक विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
माजी नगरसेविका शेख नसीम खान म्हणाल्या की, मुलगी शिक्षली तर घर, समाज आणि संपूर्ण राष्ट्र पुढे जाते. परंतु आजही अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणीमुळे मुलींच्या उच्च शिक्षणाचा, करियरचा किंवा लग्नाचा खर्च सांभाळणे कठीण जाते. हीच समस्या लक्षात घेऊन केंद्र शासनाने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. आज मुकुंदनगरमध्ये आपण राबविलेला हा उपक्रम मुलींच्या भविष्याची आर्थिक पायाभरणी आहे. सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येकाला या योजनेचा लाभ मिळायला हवा, या भावनेने हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय डाक विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी या उपक्रमाला उत्तम प्रकारे साथ दिली. या उपक्रमाचे स्थानिक महिलांनी कौतुक करुन शेख यांचे आभार मानले.
