शैक्षणिक साहित्यासह अल्पोपहाराचे वाटप; आनंदाने उजळले लहानग्यांचे चेहरे
महिलांनी मातृत्वाचा जिव्हाळा दिला-नितेश बनसोडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सावली संस्थेतील निराधार व गरजू घटकातील विद्यार्थ्यांना प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि अल्पोपहारासह फळ व चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या महिलांनी सावली मधील मुला-मुलींना मातृत्वाचे प्रेम देऊन जवळ केले. या उपक्रमाने भावनिक आणि हृदयस्पर्शी वातावरण निर्माण केले. ही भेट फक्त वस्तूंची नव्हती, ती मातृत्वाच्या प्रेमाने ओथंबलेली होती. याप्रसंगी दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, उज्वला बोगावत, मीरा पाटील, प्रयास ग्रुपच्या संस्थापिका अलकाताई मुंदडा, सावलीचे संस्थापक नितेश बनसोडे, बुरुडगाव जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आरती थोरात, लला डेंगळे, लीला अग्रवाल, पुनम अग्रवाल, सविता धामट, ज्योत्स्ना कुलकर्णी, ज्योती जोशी, राखी जाधव, रेखा मैड, जयश्री पुरोहित, मेघना मुनोत, लता आंबेकर, शुभांगी भोयर, विमल साठे, रोहिणी पवार, विद्या कुलकर्णी, सुजाता कदम, नीलिमा पवार, सुरेखा जंगम, रेखा फिरोदिया आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नितेश बनसोडे म्हणाले की, गरजू घटकांना मदत अनेकजण करतात, पण त्या मुलांना जिव्हाळ्याने जवळ घेणे, प्रेम देणे महत्त्वाचे असते. हेच त्यांच्यासाठी खरे समाधान ठरते. प्रयास आणि नम्रता दादी-नानी ग्रुपच्या महिलांनी आज या मुलांना मातृत्वाचा जिव्हाळा दिला, हे कौतुकास्पद आहे. प्रयासच्या माध्यमातून मागील तीन दशकांपासून महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्य सुरू आहे. ही महिलांची चळवळ आता समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
मीरा पाटील म्हणाल्या की, निराधार मुलांना आपण दुरावलेले समजतो, पण ते आपल्या समाजाचाच अविभाज्य भाग आहेत. त्यांना प्रेम, आधार आणि प्रोत्साहनाची गरज आहे. प्रत्येकाने या मुलांकडे आपलेपणाने पाहिले, तर त्यांचे आयुष्य उजळून निघेल. यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन घेतलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
जयाताई गायकवाड म्हणाल्या की, ग्रुपच्या सर्व महिला फक्त मनोरंजनापुरते एकत्र येत नसून, सामाजिक जबाबदारीतून आपले योगदान देत आहे. सावली संस्थेतील या लहानग्यांना प्रेमाने जवळ करताना मातृत्वाचा खरा अर्थ उमगल्याचे ते म्हणाल्या.
मुलांच्या चेहऱ्यावर फुललेल्या हास्याने सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकले. महिलांनी प्रेमाने मुलांना जवळ करुन गप्पा मारल्या, त्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि अल्पोपहारासह फळ व चॉकलेट मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद अोसंडून वाहत होता.
