• Wed. Nov 5th, 2025

वसीम सय्यदची चिकाटीतून प्रथम वर्ग अधिकारी पदाला गवसणी

ByMirror

Nov 5, 2023

क्लर्क ते प्रथम वर्ग अधिकारी होण्याचा जिद्दीचा प्रवास

अहमदनगर (प्रतिनिधी)- अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या युवकाने थेट प्रथमवर्ग अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. एक सर्वसामान्य क्लर्क ते वैद्यकिय शिक्षण व औषधे विभागात प्रथम वर्ग अधिकारी होण्याचा थक्क करणारा जिद्दीचा प्रवास आहे, मुकुंदनगर येथील वसीम अन्वर सय्यद या युवकाचा. मागील वर्षी झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून, वसीमने आपले प्रथमवर्ग अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधे विभागात मुख्य प्रशासकीय अधिकारी या पदाच्या महाराष्ट्रात फक्त तीन जागा होत्या. त्यामध्ये वसीमचा समावेश झाला असून, लवकरच त्याला नियुक्ती मिळणार आहे. अल्पसंख्यांक समाजासह इतर सर्व समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील युवकांसाठी तो एक रोल मॉडेल ठरला आहे.


नऊ वर्षांपूर्वी वसीम सय्यद याने एसबीआय बँकेत क्लर्कची परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगलेल्या वसीमने ती नोकरी न स्विकारता आपले प्रयत्न पुढे सुरु ठेवले. जलसंपदा विभागात परीक्षा देऊन तो सीनियर क्लर्क म्हणून रुजू झाला. मात्र या नोकरीवर समाधान न मानता आपले ध्येय गाठण्यासाठी त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु ठेवली. पुढे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून घेण्यात आलेली सरळ सेवा परीक्षा देऊन कृषी विभागात कार्यालयीन अधीक्षक पद मिळवून अधिकारी झाला. यावरही समाधान न मानता यशाचा ध्यास घेतलेल्या वसीमने त्यापुढेही परीक्षा देऊन शालेय शिक्षण विभागात शालेय पोषण आहार अधीक्षक या पदावर राजपत्रित अधिकारी होण्याचा मान मिळवला. त्यानंतर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,अहमदनगर येथे अधीक्षक म्हणून काही काळ कामकाज केले. आपले अंतिम ध्येय गाठण्यासाठी वसीमने 2022 मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यामध्ये यश मिळवून आपल्या स्वप्नाची पूर्ती करत वसीमने मुख्य प्रशासकीय अधिकारी (वर्ग-1) हे पद मिळवले.


वसीम हा मुकुंदनगर येथील ॲड. अन्वर सय्यद यांचा मुलगा असून, हलाकीच्या परिस्थितीतून पुढे आलेले सय्यद कुटुंबीय आहे. शिक्षणाने नशीब आणि परिस्थिती बदलते या आशेने ॲड. सय्यद यांनी आपल्या तिन्ही मुले व एका मुलीला उच्च शिक्षित केले. त्यांचा सर्वात मोठा मुलगा नदीम धर्मदाय उपायुक्त कार्यालयात वकीली करीत आहे. तर सर्वात लहान मुलगा मोहसीन हा देखील महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागात वर्ग एक अधिकारी असून सध्या नांदेड येथे सहाय्यक कामगार आयुक्त पदावर कार्यरत आहे. तर त्यांची मुलगी डॉक्टर आहे. नुकतेच वसीमने स्पर्धा परीक्षेद्वारे प्रथम वर्ग अधिकारी होण्याचा मान मिळवून जिद्द व कष्टाच्या जोरावर यश मिळवणे शक्य आहे हे सिद्ध केले आहे.


सय्यद कुटुंबीयांचा प्रेरणादायी प्रवास अल्पसंख्याक समाजासाठी एक आशेचा किरण बनला आहे. आपल्या मुलांप्रमाणे समाजातील इतर मुले देखील पुढे जाण्यासाठी सय्यद कुटुंबीयांच्या वतीने मुकुंदनगर येथील गोविंदपुरा भागात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालविण्यात येते. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. तर सय्यद बंधू येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे.



आई-वडिलांच्या कष्टातून मिळालेला आत्मविश्‍वास व कष्ट करण्याची तयारी ध्येय गाठण्यासाठी नक्कीच आशादायी ठरली. आई-वडिल व भावंडांनी दिलेल्या शिक्षणासाठी प्रोत्साहनामुळे जिद्द व चिकाटीने स्पर्धा परीक्षेत यश मिळवून ध्येय गाठता आले.ध्येय निश्‍चित करून जिद्द व चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते. आलेली संधी न सोडता, ती संधी स्विकारुन एका जागी न थांबता स्वप्नपूर्तीसाठी पुढचे शिखर गाठत जावे. -वसीम सय्यद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *