सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रातील निस्वार्थ कार्याचा सन्मान
नगर (प्रतिनिधी)- सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रातील निस्वार्थ कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना कोल्हापूर येथील आई महालक्ष्मी संमेलनात ग्रेट महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रपट अभिनेते संजय खापरे व उद्योजिका पूनम मोरे यांच्या हस्ते भालसिंग यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संमेलनाचे स्वागत अध्यक्ष व निमंत्रक प्रा.डॉ. बी.एन. खरात, स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे डॉ. मोहन गोखले आदी उपस्थित होते.
समृद्धी प्रकाशन, स्वप्नपूर्ती फाउंडेशन, जिद्द फाउंडेशन, वेद फाउंडेशन, स्वामी इंटरप्राईजेसच्या संयुक्त विद्यमाने शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे आई महालक्ष्मी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विविध क्षेत्रात पुरोगामी विचाराने निस्वार्थपणे कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात विजय भालसिंग गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहे. मुळगाव वाळकी (ता. नगर) येथील असलेले भालसिंग एसटी बॅकेची नोकरी सांभाळून निस्वार्थपणे कार्यरत असून, कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सामाजिक कार्य करत आहे. वृक्षरोपण व संवर्धनासाठी ते सातत्याने योगदान देत आहे. उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना जगणे सुसह्य व्हावे म्हणून पाणवठे तयार करुन पाणी उपलब्ध करणे, विविध परिसरात पक्ष्यांसाठी झाडांवर धान्य व पाण्याची भांडी बसविणे, सर्वत्र वाढत चाललेल्या सिमेंटच्या जंगलामुळे पशु-पक्ष्यांचे अस्तित्व राहण्यासाठी नारळाच्या साली पासून कृत्रिमरीत्या पक्ष्यांसाठी बनवलेले घरटी बसविणे आदी निसर्ग व पर्यावरणपुरक उपक्रम ते सातत्याने राबवित आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना कोल्हापूर येथील मानाचा ग्रेट महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल भालसिंग यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.