सामाजिक व पर्यावरण क्षेत्रातील निस्वार्थ कार्याचा सन्मान
नगर (प्रतिनिधी)- सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रातील दोन दशके निस्वार्थपणे कार्यरत असलेले वाळकी (ता. नगर) येथील विजय भालसिंग यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक जागृती, पर्यावरण रक्षण, वृक्षसंवर्धन आणि निसर्गाशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देणाऱ्या भालसिंग यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
जनवार्ता परिवार, समृध्दी महिला बहुउद्देशीय संस्था, रयत प्रतिष्ठान आणि क्रांतीज्योती बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण समारंभ क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त अहिल्यानगर येथे पार पडला. यावेळी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले यांच्या हस्ते त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, जालना येथील माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, जालिंदर बोरुडे, दत्ता जाधव, सारंग पंधाडे, मंगलाताई भुजबळ, अंबादास गारुडकर, रामदास फुले, जनवार्ता परिवाराचे पोपट बनकर, ॲड. महेश शिंदे, गणेश बनकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विजय भालसिंग हे एसटी बँकेच्या नोकरीसोबत कोणत्याही शासकीय मदतीशिवाय व वर्गणी न घेता स्वखर्चातून समाजासाठी कार्यरत आहेत. त्यांचा कार्यक्षेत्रातला मुख्य भर वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पशुपक्ष्यांसाठी पाणवठे व अन्नपाणी व्यवस्था, झाडांवर भांडी लावणे आणि कृत्रिम घरटी बसवणे या पर्यावरणपूरक उपक्रमांवर आहे. गर्द सिमेंटच्या जंगलांमध्ये पशुपक्ष्यांना निवारा मिळावा यासाठी नारळाच्या सालींपासून तयार केलेली कृत्रिम घरटी त्यांनी अनेक भागांत झाडांवर बसवली आहेत. उन्हाळ्यात पाणवठ्यांची निर्मिती व देखभाल करून प्राणीमात्रांचे जीवन सुसह्य करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.
विजय भालसिंग यांच्या या समाजहिताच्या निस्वार्थ कार्याबद्दल त्यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.