बहुजन भूमी संघटना व दक्ष पोलीस मित्र संघाच्या वतीने पुण्यात होणार गौरव
निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रात सुरु असलेल्या निस्वार्थ कार्याबद्दल बहुजन भूमी संघटना व दक्ष पोलीस मित्र संघाच्या वतीने समाजसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
वानवडी पुणे येथील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात 22 नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते भालसिंग यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष कैलास पठारे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा रोहिणीताई भोसले व राष्ट्रीय उपाध्यक्ष रशिद पठाण यांनी दिली.
विजय भालसिंग सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहेत. वाळकी (ता. नगर) येथील असलेले भालसिंग एसटी बॅकेची नोकरी सांभाळून निस्वार्थपणे योगदान देत असून, कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सामाजिक कार्य करत आहे. वृक्षरोपण व संवर्धनासाठी ते सातत्याने कार्य करत आहे.
उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना जगणे सुसह्य व्हावे म्हणून पाणवठे तयार करुन पाणी उपलब्ध करणे, विविध परिसरात पक्ष्यांसाठी झाडांवर धान्य व पाण्याची भांडी बसविणे, सर्वत्र वाढत चाललेल्या सिमेंटच्या जंगलामुळे पशु-पक्ष्यांचे अस्तित्व राहण्यासाठी नारळाच्या साली पासून कृत्रिमरीत्या पक्ष्यांसाठी बनवलेले घरटी बसविणे आदी निसर्ग व पर्यावरणपुरक उपक्रम ते सातत्याने राबवित आहेत. दरवर्षी आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीची सेवा करत आहे. तसेच वाळकी पंचक्रोशीतील विविध प्रश्नांवर आवाज उठवून ते सोडविण्यासाठी शासकीय स्तरावर देखील ते पाठपुरावा करत आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना समाजसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भालसिंग यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
