22 सप्टेंबरला मुंबईत होणार सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा मराठा संस्था संचलित श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बोधेगाव (ता. शेवगाव) या विद्यालयातील शिक्षिका कवियत्री तथा लेखिका श्रीमती विद्या भडके यांना सन 2024-25 या वर्षातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य शासनाकडून जाहीर झालेल्या या पुरस्काराने भडके यांनी संस्थेचे व गावाचे नाव उंचावले आहे.
श्रीमती भडके विद्या दानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाकडे लक्ष देऊन मोठ्या संख्येने विद्यार्थी घडविले असून, ते विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी जिल्हा, विभागीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये यशस्वी झाले आहेत. कवियत्री आणि लेखिका म्हणून भडके यांचे लिखाणही उत्कृष्ट असून, कथालेखन, कवितासंग्रह त्याचबरोबर इतर लेखन कलेमध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी रचलेल्या कविता मधून व लेखनामधून समाजातील संवेदनशील विषय, स्त्री पुरुष समानता, नारी सशक्तिकरण, शिक्षणाचे महत्त्व, त्याचबरोबर ग्रामीण जीवनातील प्रश्न आणि समस्या प्रभावीपणे मांडले आहेत. त्यामुळे शिक्षकच नव्हे तर एक संवेदनशील साहित्यिक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सदर पुरस्कार जाहीर झाला आहे.
22 सप्टेंबर रोजी मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते भडके यांना पुरस्काराने गौरविण्या येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक मोरे, पर्यवेक्षक सुनील साळवे आदींसह संस्थेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.