सन्मानपूर्वक वागणुक न मिळाल्यास सर्व निवडणुका स्वबळावर -प्रा. किसन चव्हाण
नगर (प्रतिनिधी)- शहरातील शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप सोडून इतर समविचारी पक्षांबरोबर वाटाघाटी करुन निवडणुका लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तर वाटाघाटी करताना सन्मानपूर्वक वागणुक न मिळाल्यास स्वबळावर सर्व निवडणुकांना सामोरे जाण्याचे देखील सुतोवाच करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक पार पडली. याप्रसंगी राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, शहराध्यक्ष हनीफ शेख, ॲड. योगेश गुंजाळ, प्रवीण ओरे, कल्याणराव भागवत, सुधीर ठोंबे, श्रीकांत बोर्डे, भीमराव शिंदे, सुरज क्षेत्रे, अशोक भिंगारदिवे, चंद्रभान भिंगारदिवे, उमेश मंडलिक, भाऊसाहेब जावळे, हिरामण भिंगारदिवे, यशवंत शिरसाठ, शंकर भिंगारदिवे, अरुण झांबरे, शाहूराव खंडागळे, आतिश पारवे, पोपट शेटे, रंजन मेघडबर, योगेश गायकवाड, महेश पवार, संतोष जंजाळ, रूपाली आढाव, पि.के. गवारे, जोसेफ शिरसाठ, प्यारेलाल शेख, रवींद्र निळ, पोपट थोरात, राहुल अडसूळ, दादा समुद्र, राजीव भिंगारदिवे, राहुल पोळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. किसन चव्हाण म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये भाजप सोडून समविचारी पक्षांबरोबर आघाडी केली जाणार आहे. परंतु नेहमीप्रमाणे समविचारी पक्षांनी आपल्याला वापरून आणि ढोपरून घेण्याचा विचार केल्यास स्वबळावर सर्व निवडणुकांना सामोरे जाण्याची देखील तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. अरुण जाधव म्हणाले की, येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद दिसणार आहे. गाव तेथे शाखा सुरु करुन पक्षाची बांधणी सुरू झाली आहे. दोन महिन्याचा कृती आराखडा कार्यकर्त्यांना देण्यात आला असून, सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहे. योगेश साठे यांनी जिल्ह्यात जोमाने पक्ष बांधणीचे कार्य सुरु असून, कार्यकर्ते झोकून काम करत आहे. जातीयवादी शक्तींबरोबर न जाता, बहुजन समाजाला बरोबर घेऊन सत्तेत स्थान मिळवण्याचे काम केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कसे सामोरे जावे? यासाठी कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यात आला. सर्व तालुका पदाधिकारी यांनी आपल्या सूचना मांडून पक्षाच्या आदेशान्वये एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीत रविकिरण जाधव यांची नगर तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.