नागपूरला 17 व 18 फेब्रुवारी रोजी होणार अधिवेशन; शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांची माहिती
शिक्षक, शिक्षकेतरांना सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी राज्य सरकारकडून दोन दिवसाची विशेष रजा मंजूर करण्यात आली आहे. 17 व 18 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे हे दोन दिवसीय अधिवेशन होणार असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या अधिवेशनात राज्य मानद सचिव संदीप जोशी, प्र. कुलगुरु डॉ. वेदप्रकाश मिश्रा, माजी आमदार महेंद्र कपूर, पदवीधर मतदारसंघ नागपूर विभाग अनिल सोले, माजी शिक्षक आमदार नागो गाणार, माजी आमदार भगवान साळुंखे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्यवाह राजकुमार बोनकिले यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जुनी पेन्शनसह अनेक महत्त्वपूर्ण मागणी संदर्भात चर्चा व निर्णायक ठराव केले जाणार आहेत. शिक्षकांच्या असणाऱ्या समस्या सुटण्यासाठी भविष्यातील दिशा ठरवली जाणार आहे. जास्तीत जास्त शिक्षक, शिक्षकेतर बांधवांनी या अधिवेशनात उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. सुनिल पंडीत, शरद दळवी, सखाराम गारूडकर, शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, सचिव शिवाजी घाडगे, प्रसाद सामलेटी, प्रा.बाबासाहेब शिंदे, प्रा. श्रीकृष्ण पवार, ग्रामीणचे शशिकांत थोरात, सर्जेराव चव्हाण, सुरेश विधाते, सत्यवान थोरे, श्रीमती अनिता सरोदे, क्रांती मुंदनकर, अरुण राशिनकर, वसंत गायकवाड यांनी केले आहे.
