कॉ.डॉ. राम बाहेती यांची राहणार प्रमुख उपस्थिती; जिल्ह्यातून 250 प्रतिनीधी होणार सहभागी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह राजकीय व सामाजिक परिस्थितीवर होणार चर्चा
नगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन शनिवारी (दि.14 जून) अहिल्यानगर शहरात होणार असल्याची माहिती भाकपचे जल्हा सचिव कॉ. ॲड. बन्सी सातपुते यांनी दिली.
पारिजात चौक, गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात सकाळी 10 वाजता या अधिवेशनाचे उद्घाटन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉ.डॉ. राम बाहेती यांच्या हस्ते होणार आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून राज्य सचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे तर भारतीय महिला फेडरेशनच्या राज्य अध्यक्ष कॉ.स्मिता पानसरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
उद्घाटन सत्रानंतर जिल्हा सचिव राजकिय व संघटनात्मक अहवाल मांडतील. विविध आघाड्यांचे अहवाल मांडले जातील.
त्यावर तालुका परिषदांमधून जिल्हा पक्ष परिषदेसाठी निवडून आलेले प्रतिनिधी चर्चा करणार आहे. परिषदेत पुढील तीन वर्षांसाठी जनतेच्या प्रश्नावर करावयाच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. तसेच तीन वर्षांसाठी नवीन कौन्सिल, कार्यकारिणी व पदाधिकारी निवडले जाणार आहे. तसेच नाशिक येथे 22ते 24 जून रोजी आयोजित राज्य अधिवेशनासाठी प्रतिनिधींची निवड करण्यात येणार आहे. या जिल्हा अधिवेशनात जिल्ह्यातून 250 प्रतिनीधी सहभागी होणार आहे. अधिवेशन परिसराला कॉ. शांताराम वाळुंज नगरी व विचार पीठाला कॉ. दादाभाऊ गायकवाड यांचे नाव देण्यात येणार. असल्याची माहिती जिल्हा सहसचिव कॉ.सुधीर टोकेकर व संतोष खोडदे यांनी दिली.
डॉ. राम बाहेती हे सद्य राजकीय व सामाजिक परिस्थितीवर मार्गदर्शन करणार आहे. परिषदेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही चर्चा होणार असून, विविध विषयांवर ठराव केले जाणार आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी, जन विरोधी व घटनाविरोधी विशेष जन सुरक्षा विधेयक, महिला सुरक्षा, स्मार्ट मिटरला विरोध, दलित, आदिवासी व सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवण्याला विरोध हे विषय केंद्रस्थानी राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने प्रलंबित असलेल्या प्रश्नावर आंदोलनाचा निर्णय घेण्यात येणार आहे.