रस्ते हिरवाईने फुलविण्याचा जय हिंद फाउंडेशन व सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम
वृक्षारोपण व संवर्धन ही एक सामाजिक सेवा -सोपानराव पालवे
नगर (प्रतिनिधी)- वर्षभर वृक्षारोपण व संवर्धनाची मोहिम राबविणारे जय हिंद फाउंडेशन व सामाजिक वनीकरण विभाग (पाथर्डी) यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हार व उदरमल रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामीण भागातील रस्त्यांचा दुतर्फा झाडांची लागवड करण्याच्या उद्देशाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला.
या वृक्षारोपण अभियानाप्रसंगी कोल्हार गावचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोपानराव पालवे, सामाजिक वनीकरण विभागचे (पाथर्डी) वनपाल विजय जावळे, ह.भ.प. राम महाराज घुले, निवृत्त पोलीस अधिकारी बाबाजी पालवे, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, ॲड. संदीप जावळे, रामकिसन पालवे, संदिप पालवे, सत्यवान घुले, पप्पू पालवे आदी उपस्थित होते.
सोपानराव पालवे म्हणाले की, वृक्षारोपण व संवर्धन ही एक सामाजिक सेवा असून, यामुळे निसर्गाचा समतोल साधला जाणार आहे. जय हिंद फाऊंडेशनने जिल्ह्यातील पर्यावरण चळवळीला गती देवून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण घडवून आणले आहे. वृक्ष बँक सारखे प्रकल्प राबवून वर्षभर सुरु असलेली त्यांची निस्वार्थ सेवा प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
ह.भ.प. राम महाराज घुले म्हणाले की, संत तुकाराम महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण मध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे. भविष्यात पावसाचे प्रमाण कमी होत चालले असून, त्यामुळे वाढते तापमान, अवकाळी पाऊस, दुष्काळ परिस्थिती या नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक व्यक्तीने वृक्ष क्रांती चळवळीमध्ये सहभाग घेतला तर ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न सुटून बळीराजा सुखावेल आणि धरतीवर आनंद निर्माण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर जय हिंदच्या वृक्षारोपण व संवर्धन चळवळीत सक्रीयपणे सहभागी होण्याचे व या चळवळीला हातभार लावण्याचे आवाहन केले.