13 ऑक्टोबरला शहरात रंगणार सप्तरंग महोत्सव
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सप्तरंग थिएटर्सच्या वतीने देण्यात येणारा सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार यंदा मुंबई येथील जेष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम यांना जाहीर झाला आहे. अरूण कदम हे मागील 35 वर्षांपासून महाराष्ट्राच्या हौशी रंगभूमीवर लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि तंत्रज्ञ या क्षेत्रात कार्यरत आहेत. रविवार दि. 13 ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या सप्तरंग महोत्सवात कदम यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तर सोमवारी (दि.14 ऑक्टोबर) नवोदित कलाकारांसाठी जेष्ठ नाट्यकर्मी कदम यांची कार्यशाळा होणार असून, ते विविध विषयांवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सप्तरंग महोत्सवाचे स्वागताध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे व संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्याम शिंदे यांनी दिली.

शहरातील यश ग्रॅड हॉटेलच्या सभगृहामध्ये सप्तरंग थिएटर्सच्या 38 व्या वर्धापन दिनानिमित्त सप्तरंग महोत्सव रंगणार आहे. महाराष्ट्रातील हौशी नाट्यक्षेत्रात 30 वर्षापेक्षा जास्त कालावधी कार्यरत असलेल्या एकाच व्यक्तीला सप्तरंग नाट्य गौरव पुरस्कार देण्यात येतो. यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव किंवा शिफारसी मागविल्या जात नाहीत. अहमदनगर जिल्ह्याबाहेरील नाट्य कलावंतास हा पुरस्कार देण्यात येतो. विश्वस्त मंडळाकडून बहुमताने पुरस्कार्थीची निवड करण्यात येते.
अरूण कदम हे बृहन्मुबंई महानगर पालिकेतून कार्यकारी अभियंता पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांनी जागतिक रंगभूमीच्या इतिहासावर नाटक-नाटक नावाचा ग्रंथ लिहीला आहे. त्यांना आजतागायत मराठी व हिंदी भाषेत 80 हून अधिक नाटके करण्याचा अनुभव आहे. हौशी नाट्यसृष्टीत लेखक, नेपथ्यकार, प्रकाश योजना आणि अभिनेता म्हणून गेली 35 वर्ष ते कार्यरत आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये मटा सन्मान, झी गौरव पुरस्कार व रोटरी क्लब ऑफ इंडिया तर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट अभियंता पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. महापालिकेच्या कलावंतांसाठी सुरू करण्यात आलेल्या मनवंतर कला अकदामीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी राज्य भरात होत असलेल्या शासनाच्या व विविध संस्थांच्या नाट्य स्पर्धांचे परिक्षण केले आहे.
या निमित्ताने संस्थेच्या 38 वर्षांच्या वाटचालीची माहिती देणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत एक हजार पेक्षा जास्त कलाकारांनी प्रशिक्षण व अभिनयाचे धडे घेतले आहेत. आज पर्यंत मराठी, हिंदी व बाल राज्यनाट्य स्पर्धांमध्ये संस्थेला 170 हून अधिक पारितोषिके प्राप्त झाली आहेत. सप्तरंगच्या वतीने या कार्यक्रमात नाट्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या व विविध ठिकाणी पुरस्कार प्राप्त झालेल्या कलावंतांचा सन्मान केला जाणार असल्याचे डॉ. श्याम शिंदे यांनी म्हंटले आहे. या समारंभात व होणाऱ्या नाट्य कार्यशाळेसाठी नाट्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सप्तरंगच्या विश्वस्तांनी व सदस्यांनी केले आहे.
