आरणगावच्या मानव सेवा प्रकल्पात विद्यार्थ्यांची अनोखी दिवाळी; किराणा, कपडे, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
सामाजिक बांधिलकीचा नवा संस्कार; शाळेतील ‘वन नाईट स्टे’ उपक्रमानेही विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा आनंद आणि नवीन कपड्यांची खरेदी नव्हे, तर आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्याचा आणि माणुसकीचा प्रकाश सर्वत्र पसरविण्याचा सण आहे. हाच दिवाळीचा खरा अर्थ कृतीतून जपत केडगाव येथील जेएसएस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आरणगाव येथील मानव सेवा प्रकल्पातील वंचितांसोबत दिवाळी साजरी केली. विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत किराणा साहित्य, कपडे, अन्नधान्य, साफसफाईचे साहित्य तसेच दैनंदिन वापरातील विविध जीवनावश्यक वस्तू भेट देत गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला. प्राचार्य आनंद कटारिया आणि निकिता कटारिया यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ मदतकार्य न ठरता माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार देणारा अनुभव ठरला.
दिवाळीच्या सणाचा आनंद प्रत्येकाला मिळावा आणि समाजातील वंचित घटकांनाही सणाचा गोडवा अनुभवता यावा, या उद्देशाने जेएसएस गुरुकुलच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्राचार्य आनंद कटारिया यांनी विद्यार्थ्यांना आपापल्या घरून शक्य होईल त्या स्वरूपात मदत घेऊन येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक जाणिवेचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेनुसार विविध वस्तू गोळा केल्या. काही विद्यार्थ्यांनी किराणा साहित्य, काहींनी कपडे, तर काहींनी साफसफाईसाठी लागणारे साहित्य आणले. याशिवाय अन्नधान्य आणि दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचाही समावेश करण्यात आला. एकत्रितपणे जमा केलेले हे साहित्य मानव सेवा प्रकल्पातील गरजूंसाठी भेट देण्यात आले.
मानव सेवा प्रकल्पाला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना तेथील वंचितांची परिस्थिती, त्यांचे संगोपन, दैनंदिन गरजा आणि प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांची घेतली जाणारी काळजी याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. समाजातील गरजू घटकांसाठी कोणत्या प्रकारे सेवा आणि मदतकार्य केले जाते, याची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन समाजातील वास्तव परिस्थिती समजून घेण्याची संधी या भेटीमुळे विद्यार्थ्यांना मिळाली.
प्रकल्पाचे कार्य आणि तेथील वंचितांची परिस्थिती जाणून घेताना अनेक विद्यार्थी भावूक झाले. आपल्या आजूबाजूला अनेक जण विविध अडचणींना सामोरे जात असतात, त्यांना मदतीचा हात देणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. दिवाळीचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गरजूंच्या जीवनातही आनंदाचे क्षण निर्माण करण्याची प्रेरणा या उपक्रमातून मिळाली.
विशेष म्हणजे, या भेटीनंतर विद्यार्थ्यांनी केवळ दिवाळीपुरतेच मदतकार्य मर्यादित न ठेवता यापुढे आपले वाढदिवस आणि जीवनातील विविध आनंदाचे प्रसंगही मानव सेवा प्रकल्पातील वंचितांसोबत सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या उपक्रमाबद्दल मानव सेवा प्रकल्पाच्या वतीने जेएसएस गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया आणि निकिता कटारिया यांचे विशेष कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देणे पुरेसे नसून त्यांच्यामध्ये माणुसकी, संवेदनशीलता, सहकार्य, सामाजिक बांधिलकी आणि गरजूंबद्दल आपुलकीची भावना निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जेएसएस गुरुकुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच असे संस्कार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत असल्याची भावना प्रकल्पाचे जाधव यांनी व्यक्त केली.
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबत सामाजिक परिस्थितीचे भान ठेवणे आवश्यक आहे. समाजातील विविध घटकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी आपल्या परीने योगदान देण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली, तर भविष्यात संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडण्यास मदत होईल. याच विचारातून गुरुकुलने राबविलेला असल्याचे प्राचार्य आनंद कटारिया यांनी सांगितले.
–—
‘वन नाईट स्टे’मधून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित!
दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी शाळेतच एकत्रित ‘वन नाईट स्टे’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील नेहमीच्या शैक्षणिक वातावरणापेक्षा वेगळा अनुभव देणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालविण्याची, एकत्रित राहण्याची आणि विविध आनंददायी क्षण अनुभवण्याची संधी मिळाली. शाळेतच मुक्काम करण्याच्या या अनोख्या अनुभवामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आनंद द्विगुणित झाला. एकीकडे वंचितांसोबत दिवाळी साजरी करून सामाजिक बांधिलकीचे संस्कार रुजविणे, तर दुसरीकडे ‘वन नाईट स्टे’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायी सामूहिक अनुभव देणे, अशा दुहेरी स्वरूपाच्या उपक्रमांमुळे जेएसएस गुरुकुलमधील दिवाळी विशेष ठरली.

