हुतात्मा स्मारकात लोकशाहीच्या पंचमहाभूतांचे दीपप्रज्वलन; प्रत्येक अंगणात रेन गेन बॅटरी आणि दोन झाडे लावण्याचे आवाहन
दिवाळीत पर्यावरणाचा जागर; ‘हरित श्रीमंत भारत’ घडविण्याचा निर्धार!
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भीमाशंकर-सह्याद्री परिसरातील वनसंपदेची होत असलेली कथित वृक्षतोड थांबवून पर्यावरणाचे रक्षण करावे, तसेच लोकाभिमुख आणि कर्तव्यनिष्ठ प्रशासन निर्माण व्हावे, या मागणीसाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने शुक्रवारी (दि. 6 नोव्हेंबर) अहिल्यानगर येथील हुतात्मा स्मारकात अनोख्या पद्धतीने ‘वनत्रयोदशी’ साजरी करण्यात आली. यावेळी वृक्षतोडीला जबाबदार असलेल्या सत्ताप्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी ‘दुर्योधनी सत्तेच्या खुर्ची’चे प्रतीकात्मक पाय कापण्यात आले. तसेच लोकशाहीच्या पंचमहाभूतांचे प्रतीक असलेल्या पाच पणत्यांचे दीपप्रज्वलन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. प्रत्येक घराच्या अंगणात पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी एक ‘रेन गेन बॅटरी’ आणि किमान दोन झाडे लावून ‘हरित श्रीमंत भारत’ घडविण्याचा देशव्यापी संकल्प यावेळी करण्यात आला.
या आंदोलनात ॲड. कारभारी गवळी, वीरबहादूर प्रजापती, अशोक सब्बन, राहुल आढाव, विठ्ठल ठुबे, शाहीर कान्हू सुंबे, पोपट भोसले, आनंदा आढाव, बाळासाहेब पालवे, अशोक भोसले, आसाराम सातपुते, नंदा कुलट, आसाराम बर्डे, विलास बर्डे, हिरामन गायकवाड, बबलू खोसला, दत्तात्रय साबळे आदी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पांजली अर्पण करून देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर लोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती, संवैधानिक नैतिकता आणि कायद्याचे राज्य या लोकशाहीच्या पाच मूलभूत मूल्यांचे प्रतीक म्हणून पाच पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. लोकशाही ही केवळ सत्तेची व्यवस्था नसून ती जनतेप्रती असलेली जबाबदारी आणि नैतिकतेवर आधारित असली पाहिजे. शासनकर्ते आणि प्रशासनातील प्रत्येक घटकाने या मूल्यांच्या प्रकाशात काम करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
भीमाशंकर-सह्याद्री परिसरातील जलविद्युत प्रकल्पासाठी सुमारे 300 वर्षे जुन्या वृक्षांसह हजारो झाडांची तोड झाल्याचा आरोप आयोजकांनी केला. वनसंपदा आणि जैवविविधतेचा नाश करणाऱ्या या वृक्षतोडीला जबाबदार असलेल्या सत्ताप्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी ‘दुर्योधनी सत्तेची खुर्ची’ हे प्रतीक उभारण्यात आले होते. या खुर्चीचे प्रतीकात्मक पाय कापून सत्तेच्या अहंकाराचा आणि पर्यावरणविरोधी निर्णयप्रक्रियेचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी ‘दुर्योधन-त्रयोदशीला डिच्चू फत्ते!’, ‘वृक्षतोड थांबवा, सह्याद्री वाचवा!’ आणि ‘भीमाशंकर सत्याग्रहाचा विजय असो!’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. जंगलांचे अस्तित्व टिकले तरच पाणी, माती, वन्यजीव आणि मानवी जीवनाचे भवितव्य सुरक्षित राहील. त्यामुळे विकासाच्या नावाखाली निसर्गसंपत्तीचा विनाश होऊ नये, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
सार्वजनिक जीवनात कायदेशीर कर्तव्ये आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडण्यात कसूर करणाऱ्या राजकीय सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना उद्देशून ‘तुकाराम मुंढे यांच्या नखांची दिवाळी भेट’ हा प्रतीकात्मक उपक्रमही राबविण्यात आला. कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचे नखाएवढे तरी अनुकरण करून प्रत्येक अधिकारी आणि लोकप्रतिनिधीने जनतेप्रती असलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, हा या उपक्रमामागील संदेश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. हा संदेश देशभर पोहोचविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
वनत्रयोदशीचे औचित्य साधून उपस्थित कार्यकर्त्यांनी झाडांना पाणी घालून वृक्षपूजन केले. केवळ वृक्षारोपण करून थांबण्याऐवजी लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे आवाहन करण्यात आले. पावसाचे पाणी वाहून जाण्यापासून रोखून ते जमिनीत मुरविण्यासाठी प्रत्येक घराच्या अंगणात एक ‘रेन गेन बॅटरी’ उभारावी. त्याचबरोबर किमान दोन झाडे, शक्यतो फळझाडे लावून त्यांची नियमित निगा राखावी, असा देशव्यापी संकल्प जाहीर करण्यात आला.
पाणी, माती, वनस्पती आणि सजीवसृष्टी यांचे परस्परांशी असलेले नाते जपल्याशिवाय पर्यावरणाचा समतोल राखणे शक्य नाही. पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि वृक्षसंपदा जतन करणे या तीन गोष्टी प्रत्येक कुटुंबाने आपल्या जीवनशैलीचा भाग बनवाव्यात. यातूनच पर्यावरणीय समृद्धीबरोबर आर्थिक आणि सामाजिक समृद्धी साधता येईल, असे मत ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केले. ‘घराघरांत आणि जगभरात वनत्रयोदशी!’ आणि ‘हरित श्रीमंत भारत घडवूया!’ या घोषणांमधून पर्यावरण संवर्धनाचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकर्त्यांना दिवाळीनिमित्त लाडू आणि चिवड्याचे वाटप करण्यात आले.

