जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने ऑनलाईन नाव नोंदणीचे आवाहन
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुलात 10व 11 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 14 , 16, 18, 20 व 23 वर्ष वयोगटातील मुले व मुलींच्या मैदानी स्पर्धा होणार असून, या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करावी लागणार असल्याची माहिती छत्रपती पुरस्कार विजेते प्रा. सुनील जाधव व सचिव दिनेश भालेराव यांनी दिली.
या स्पर्धेतील विविध गटातील प्रथम दोन क्रमांकाच्या खेळाडूंची जिल्हा संघात निवड होणार असून ते खेळाडू सप्टेंबर महिन्यात पुणे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना 5 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आपल्या सोबत मूळ जन्म दाखला व आधार कार्ड ठेवणे आवश्यक आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक महसंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर व असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संदीप घावटे, रमेश वाघमारे, जगन गवांदे, राहुल काळे, श्रीरामसेतू आवारी, संदीप हारदे, राघवेंद्र धनगडे, सुजय बाबर, संभाजी ढेरे आदींसह जिल्ह्यातील सर्व क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक परिश्रम घेत आहेत. अधिक माहितीसाठी दिनेश भालेराव 9226238536, जगन गवांदे 9881328186 व श्रीरामसेतु आवारी 9322015046 यांना संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.