जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर 12 डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या पेन्शन जनक्रांती महामोर्चात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या मोर्चात जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी केले आहे.
31 ऑक्टोबर 2005 च्या वित्त विभाग शासन निर्णयाद्वारे 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेले शासकीय कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सध्याची एनपीएस योजना लागू करण्यात आलेली आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात जे शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत आले, परंतु ती शाळा किंवा तुकडी 1 नोव्हेंबर 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आली अशा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना देखील जुनी पेन्शन पासून डावलण्यात आले आहे. आर्थिक शोषण करणारा हा काळा शासन निर्णय रद्द करावा अशी शिक्षक परिषदेची भूमिका राहिलेली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षक परिषदेने सातत्याने संविधानिक मार्गाचा अवलंब करून नियमावली 1981 मधील नियम क्रमांक 19 व 20 (2) आजही अस्तित्वात असल्याची जाणीव तत्कालीन शिक्षक परिषदेचे आमदार नागो गाणार, भगवानराव साळुंखे, व रामनाथ दादा मोते यांनी सभागृहाला करून दिली होती. पुढे हा एमइपीएस मधील नियम 19 व 20 (2) बदलण्याची अधिसूचना डिसेंबर 2020 मध्ये रद्द करण्यात आली. दरम्यान राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने 14 मार्च ते 20 मार्च 2023 रोजी केलेल्या आंदोलनातही शिक्षक परिषदेने सक्रिय सहभाग घेतला होता. या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने नवीन व जुनी पेन्शन तुलनात्मक अभ्यास करण्या संदर्भात समिती गठीत केली. तीन महिन्यात मुदतीत सदर समितीने शासनाला अहवाल सादर केला नाही, म्हणून समितीला पुढील मुदतवाढ देण्यात आली. सातत्याने मुदतवाढ दिल्याने शासन विषयी शंका निर्माण होत आहे. म्हणून सदर अहवाल मुदतीत प्राप्त करून घ्यावा याकरिता शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हास्तरावरून मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात याची देखील दखल घेण्यात आलेली नाही.
शासन पेन्शनचा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर 12 डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या पेन्शन जनक्रांती महामोर्चात शिक्षक परिषदेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, राज्य सरकार्यवाह राजकुमार बोनकिले, राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, माजी आमदार भगवानराव साळुंखे, नागो गाणार, नरेंद्र वातकर, किरण भावठनकर, पूजाताई चौधरी, सुनील पंडित, शरद दळवी, सखाराम गारुडकर, अनिता सरोदे, प्रा. सुनिल सुसरे, प्रा. अशोक झिने, विठ्ठल ढगे, शशिकांत थोरात, बबन शिंदे, बाबासाहेब ढगे, प्रा. शिवाजी घाडगे, प्रसाद सामलेटी, सर्जेराव चव्हाण, सुरेश विधाते, प्रदीप बोरुडे आदी प्रयत्नशील आहेत.