• Sun. Oct 26th, 2025

ऋणानुबंध संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार

ByMirror

Feb 10, 2025

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्काराने सन्मान

समाजातील संवेदना जागृक करण्यासाठी, निस्वार्थ सामाजिक कार्य पुढे आणण्याची गरज -सिद्धराम सालीमठ

नगर (प्रतिनिधी)- समाजात संवेदना बोथट होत चालल्या असून, निस्वार्थपणे समाजासाठी कार्य करत असलेल्यांचे कार्य पुढे आणण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे समाजाला एक प्रेरणा, दिशा व ऊर्जा मिळणार असल्याचे स्पष्ट करुन, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी समाजातील संवेदनांची स्थिती आणि सामाजिक कार्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
ऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा 2023-24 यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शहरातील माऊली सभागृहात पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. याप्रसंगी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, ऋणानुबंध संस्थेचे अध्यक्ष अजित रोकडे, उपाध्यक्ष सारिका रघुवंशी, सचिव प्रशांत बंडगर, सुफी गायक पवन नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


पुढे बोलताना जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सामाजिक कार्य करणाऱ्यांचा आदर्श समोर ठेवून, समाजातील संवेदना जागृक करण्याचे काम केले गेले पाहिजे. विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्यांची एक पुस्तिका तयार करून ती सर्वांपर्यंत पोहोचल्यास या कामाची व्याप्ती वाढणार आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते कुवत नसताना देखील संघर्षातून सामाजिक कार्य करत आहे, त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात अजित रोकडे यांनी विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळे काम करणाऱ्या व्यक्तींचे काम लोकांसमोर आणून त्यांचा सन्मान करणे व नागरिकांपर्यंत त्यांचे कार्य पोहोचविणे, हा या पुरस्कार सोहळ्यामागील उद्देश्‍य असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदी-मराठी गीतांची मैफल रंगली होती. यामध्ये शिर्डीवाले साईबाबा, बेखुदी ने सनम, देखा एक ख्वाब, तुमसे मिलकर ऐसा लगा आणि अन्य हिंदी-मराठी गीतांचे सादरीकरण करण्यात आले. रसिक श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल पुणे येथील उद्योजक विजय मोरे, तृतीयपंथीय डॉ. आम्रपाली उर्फ अमित मोहिते, नाशिकचे महंत डॉ. रत्नाकर पवार, संदीप सोनवणे, लातूरचे कृषी क्षेत्रातील कार्य करणारे बाळासाहेब दाताळ, आरोग्य क्षेत्रातील डॉ. दीप्ती साळी, शिक्षण क्षेत्रासाठी शिशु संगोपन संस्थेचे दशरथ खोसे, इतिहास संशोधन आणि संवर्धन कार्यासाठी पत्रकार भूषण देशमुख व मराठी भाषा संवर्धनासाठी तुकाराम जगताप यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, कृषी व ग्रामीण पत्रकारितेसाठी कै. अशोक तुपे यांना मरणोपरांत पुरस्काराने गौरविण्यात आले.


याचबरोबर सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षापासून योगदान देत असलेले हेल्पिंग हॅन्ड्स फॉर हंगर्स ग्रुप, बालघर प्रकल्पाचे युवराज गुंड, सावली संस्थेचे नितेश बनसोडे आणि श्रीगोंदा येथी पारधी-आदिवासी मुलांसाठी संस्था चालवणाऱ्या शुभांगी झेंडे यांना विशेष सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यानंतर सभागृहात सोडत पद्धतीने भाग्यवान विजेत्यांना पैठणी साडीचे बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारुता शिवकुमार यांनी केले. आभार सारिका रघुवंशी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *