पुढील निर्णयाची प्रतिक्षा; सर्व कार्यकर्ते एकसंघपणे पाठीशी
सरकारने ओबीसींच्या संयमाचा बांध तुटू देऊ नये -भरत गारुडकर
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा छगन भुजबळ यांना डावलले गेल्याने संपूर्ण महाराष्ट्रात नाराजीचे सूर उमटत आहे. शहरातील महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथे जावून भुजबळ यांची भेट घेतली. तर भुजबळ यांचे पुढील निर्णयापर्यंत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते संयम पाळत असल्याचे स्पष्ट करुन एकसंघपणे सर्व त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भरत गारुडकर यांनी भुजबळ यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी संकेत खामकर,संजय डाके, बंडू कोथिंबीरे, अर्जुन लोंढे आदी उपस्थित होते. भुजबळ यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आक्रमक पवित्रा न घेता संयमाने समाजकारण करण्याचे आवाहन केले.
जातीय प्रवृत्तीतून ओबीसी समाजाचा आवाज दाबण्याच्या उद्देशाने छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळातून बाजूला करण्यात आले आहे. या राजकीय भूमिकेमुळे सर्व ओबीसी समाज नाराज असून, याची किंमत देखील भविष्यात सरकारला मोजावी लागणार आहे. ओबीसींच्या संयमाचा बांध तुटू देऊ नये. भुजबळ यांना एकटे पाडण्याचा डाव असून, या दबावतंत्राला ओबीसी समाज बळी पडणार नाही. सर्व समता परिषद व ओबीसी समाज त्यांच्या पाठिशी एकवटला असल्याची भावना भरत गारुडकर यांनी व्यक्त केली आहे.
