• Sat. Nov 1st, 2025

शहरात सरदार @150 पदयात्रेतून (युनिटी मार्च) एक भारत, आत्मनिर्भर भारतचा संदेश

ByMirror

Nov 1, 2025

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीचा उपक्रम


राष्ट्रीय एकतेचा जयघोष; युवक-युवतींनी एकात्मतेची शपथ घेऊन फडकाविले तिरंगे ध्वज

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एक भारत, आत्मनिर्भर भारत घडविण्याचा संकल्प घेऊन, भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.31 ऑक्टोबर) अहिल्यानगर शहरात सरदार @150 पदयात्रा (युनिटी मार्च) उत्साहात पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा पोलीस दल, जिल्हा परिषद कार्यालय व अहिल्यानगर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते पदयात्रेचा (युनिटी मार्च) शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी दरेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुनाल सपकाळे व प्रविण पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, श्रीकृष्ण मुरकुटे, अनिल मोहिते, निखील वारे, ॲड. महेश शिंदे, ॲड. विवेक नाईक, बाळासाहेब पाटोळे, रमेश गाडगे, महेश नामदे, अशोक गायकवाड, गिता गिल्डा, ज्योती दांडगे, बंटी डापसे आदी मान्यवर उपस्थित होते.


जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की, देशाच्या विकासाचा पाया म्हणजे एकता आहे. युवकांनी राष्ट्रनिर्मितीत सहभागी होऊन आत्मनिर्भर भारताची उभारणी करावी. समर्पित भावनेने योगदान द्यावे. समाजातील सर्व घटक एकत्र येतात हेच देशाच्या एकतेचे प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष यांनी केले.


सकाळी 7 वाजल्यापासून जुने बसस्थानक चौकात योगा, झुंबा व देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम रंगले होते. त्यानंतर 7:30 वाजता पदयात्रेला प्रारंभ झाले. यामध्ये विविध प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी, युवक-युवती, खेळाडू, स्वयंसेवक, तसेच शहरातील अनेक सामाजिक संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना एकात्मतेची शपथ देण्यात आली.


पदयात्रेत युवक-युवतींनी भारत माता की जय…, वंदे मातरम…, एक भारत, मजबूत भारत… अशा घोषणांनी वातावरण देशभक्तीने भारून टाकले. सर्वांच्या हातात तिरंगे झळकत होते. एकतेचा, राष्ट्रनिर्मितीचा आणि आत्मनिर्भरतेचा संदेश देत ही पदयात्रा पुढे मार्गक्रमण करत होती. मार्केटयार्ड चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दौड पुढे निघाली. माळीवाडा, वाडिया पार्क, टिळक रोड आणि नगर-पुणे मार्गाने परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर या पदयात्रेचा समारोप झाला.


समारोपाच्या कार्यक्रमात युवक-युवतींनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे पारंपरिक नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. एकतेत शक्ती असल्याचा संदेश त्यांच्या सादरीकरणातून उमटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. या उपक्रमास अजिंक्य फिटनेस क्लब, विविध क्रीडा अकॅडमी आणि स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *