युवकांसाठी विविध स्पर्धेसह कौशल्य विकास प्रशिक्षण, कायदे विषयी माहिती व कवी संमेलनाचे आयोजन
समाजाला व देशाला विकसित करणारा सक्षम घटक म्हणजे युवा वर्ग -न्यायाधीश भाग्यश्री पाटील
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाला व देशाला विकसित करणारा सक्षम घटक म्हणजे युवा वर्ग आहे. समाज परिवर्तनाच्या स्थानात युवकांना विशेष स्थान असून, आजची तरुणाई उद्याचा सक्षम भारताचा भवितव्य आहे. सामाजिक जबाबदारी आणि आव्हाने पेलवण्यासाठी सक्षम व आदर्श युवक घडविण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी केले.
जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र व जय युवा अकॅडमीच्या वतीने राष्ट्रीय युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या नियोजनार्थ जिल्हा न्यायालय विधी विभाग येथे घेण्यात आलेल्या बैठकित न्यायाधीश बोलत होत्या. याप्रसंगी विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, ॲड. भूषण बऱ्हाटे, ॲड. राजाभाऊ शिर्के, नर्मदा फाउंडेशनचे ॲड. सुनील तोडकर, माहेर फाउंडेशनच्या रजनीताई ताठे, ॲड. गौरी सामलेटी, रायझिंग युवाच्या ॲड. प्रणाली चव्हाण, उडान फाउंडेशनच्या आरती शिंदे, आधारवड संस्थेच्या ॲड. अनिता दिघे, रयतचे पोपट बनकर, जय युवाचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, सावित्रीज्योती महोत्सवाचे स्वागताध्यक्ष सुहासराव सोनवणे आदी उपस्थित होते.
ॲड. सुरेश लगड म्हणाले की, आजचे युवक मोबाईलच्या विळख्यात अडकलेला आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी युवा सप्ताहाच्या माध्यमातून विविध कलागुण, मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये युवकांनी आपला सहभाग नोंदवावा व आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचे त्यांनी आवाहन केले.
ॲड. महेश शिंदे यांनी युवा सप्ताहामध्ये समूह नृत्य स्पर्धा, वैयक्तिक नृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाट्य, चित्रकला, उखाणे आदी विविध स्पर्धा, युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण, कायदे विषयी माहिती, कवी संमेलन, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, बचत गट उत्पादन स्टॉल, लोककला सादरीकरण असे विविध उपक्रमाचे आयोजन युवा सप्ताहात करण्यात आले असल्याची माहिती दिली.
सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात 12 जानेवारी रोजी युवा सप्ताहाचे उद्घाटन न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या बैठकीचे सूत्रसंचालन ॲड. अनिता दिघे यांनी केले. आभार रजनीताई ताठे यांनी मानले. युवा सप्ताहासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे, नेहरू युवा केंद्राचे राज्य उपसंचालक शिवाजी खरात, सिद्धार्थ चव्हाण, संजय गर्जे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.