अस्तित्वात नसलेल्या जागेची एकाच दिवशी खरेदी, गहाणखत आणि कर्ज वितरणाचा गौडबंगाल
चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हे दाखल होण्यासाठी रिपब्लिकन युवा सेनेचे उपोषण
अहमदनगर (प्रतिनिधी)- अस्तित्वात नसलेल्या व केवळ 7/12 उतारा असलेल्या जमीनीची एकाच दिवशी खरेदी, त्याच दिवशी गहाणखत आणि त्याच दिवशी कर्ज देऊन खात्यातून कोट्यावधी रुपये काढून तब्बल 12 कोटी रुपयांचा अपहार झालेल्या शहराच्या मार्केटयार्ड येथील व श्रीरामपूरचे माजी आमदार चेअरमन असलेल्या त्या सहकारी बँकेच्या चेअरमन, संचालक मंडळ, कर्ज समिती सदस्य, शाखाधिकारी व सीईओ यांच्यावर गुन्हे दाखल होण्यासाठी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर गुरुवारी स्वातंत्र्यदिनी (दि.15 ऑगस्ट) उपोषण करण्यात आले. युवा सेनेचे जिल्हा संघटक मेहर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उपोषणात चंद्रकांत जाधव, अमोल मकासरे सहभागी झाले होते.
श्रीरामपूरचे माजी आमदार चेअरमन असलेल्या मार्केटयार्ड येथील त्या सहकारी बँकेत चेअरमन, संचालक मंडळ, कर्ज समिती सदस्य, शाखाधिकारी व सीईओ यांच्या संगनमताने रस्त्यात गेलेल्या व अस्तित्वात नसलेल्या जागेची बँकेत गहाणखत करून कोट्यावधी रुपयांचा अपहार झालेला आहे. त्या जागेवर कर्ज मंजूर करून गोरगरिबांच्या ठेवीच्या पैश्यांची उधळपट्टी करुन टक्केवारी घेण्यात आलेली आहे. यामधील कर्जदार अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपी असून, त्यांना देखील कर्ज देऊन कर्जातून पैश्याचा मलिदा लाटण्यात आला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
कर्जदार प्रवीण लहारे या सहकारी बँकेने 4 कोटी 35 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. लहारे हा नगर अर्बन बँकेत कर्जदार असून, त्याच्यावर आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हे दाखल होऊन तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. लहारे याने घेतलेल्या कर्जातून त्याला फक्त 2 लाख रुपये देऊन बाकीची रक्कम ही बँकेच्या एनपीए कमी करण्यासाठी वापरली व काही रक्कम बँकेचे चेअरमन, संचालक मंडळ, कर्ज समिती सदस्य, शाखाधिकारी व सीईओ यांनी आपापसात वाटून घेतली आहे. त्याने बँकेत जमा केलेले जेआरटीआर ते सुद्धा बनावट आहे. त्याला बँकेने 14 ऑक्टोंबर 2019 रोजी कर्ज दिले. त्याच दिवशी त्याने जागेची खरेदी व गहाणखत केले. आणि त्याच दिवशी कर्ज खात्यातून 2 कोटी 25 लाख सुद्धा त्याच दिवशी रोख काढण्यात आले आहे. हा सर्व प्रकार एकाच दिवशी घडलेला आहे.
परेश वाघ या कर्जदाराला रस्त्यात गेलेल्या जागेवर 1 कोटी 80 लाखाचे कर्ज बनावट कागदपत्राच्या आधारे दिले आहे. 2017 साली त्याने नगर अर्बन बँकेतून कोट्यवधी रुपयाचे कर्ज घेतले असून, त्याचे कर्ज संपूर्णतः थकीत आहे. त्याचे खाते एनपीए आहे. तरी देखील त्याच्याकडून टक्केवारी घेऊन संबंधितांनी 21 डिसेंबर 2019 ला 1 कोटी 80 लाख कर्ज मंजूर व वितरित केले. वाघ यांना दिलेले कर्ज रस्त्यात गेलेल्या जागेवर देण्यात आले आहे. सदर जागा अस्तित्वात नाही केवळ सातबारा उताऱ्यावर आहे. विशेष म्हणजे 21 डिसेंबर रोजी जागेची खरेदी घेतली, त्याच दिवशी गहाणखत केले आणि त्याच दिवशी त्याच्या खात्यातून सर्व रक्कम 1 कोटी 80 लाख गायब झाल्याचे पुरावे आहेत.
रामदास आवताडे व प्रकाश आंधळे यांना बँकेने रस्त्यात गेलेल्या 19 आर मिळकतीवर प्रत्येकी 2 कोटी 10 लाख असे एकूण 4 कोटी 20 लाख कर्ज दिले. आंधळे यांचे भिंगार अर्बन बँकेतील कोट्यावधी रुपयांचे कर्ज थकीत असून, आंधळे यांचे कर्ज खाते एनपीए मध्ये असताना कोट्यावधीचे कर्ज अस्तित्वात नसलेल्या जागेवर देण्यात आलेले आहे. या प्रकरणात सुद्धा खरेदीखत, गहाणखत व कर्ज वितरण एकाच दिवशी झाले आहे. अवताडे यांनी बँकेला दिलेले आयटीआर देखील बनावट असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या सर्व प्रकरणातून या बँकेतील व त्यांच्या इतर शाखेतील मोठा भ्रष्टाचार व अपहार बाहेर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचे सर्व पुरावे 12 ऑगस्ट रोजी जिल्हा उपनिबंधक यांना सादर करण्यात आले आहे. यामधील संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावे, कर्ज दिलेल्या जागेची प्रत्यक्ष पहाणी करावी, बँकेवर प्रशासक नेमावा व सदरील प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.