• Thu. Oct 30th, 2025

शहरात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी साजरी

ByMirror

Apr 10, 2024

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात अभिवादन

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. शालेय शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थ्यांनी लक्ष्मीबाई व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.


माध्यमिकच्या प्राचार्या छायाताई काकडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे लाईफ मेंबर प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके, एम.एन. भद्रे, उर्मिला साळुंके, मीनाक्षी खोडदे, एस.एस. लांडगे, ए.ए. धामणे आदी उपस्थित होते.


छायाताई काकडे म्हणाल्या की, कर्मवीर भाऊराव यांचे स्वप्न साकारण्यासाठी लक्ष्मीबाई त्यांच्या पाठिशी सावलीसारख्या उभ्या राहिल्या. त्यांनी स्वतःला या कार्यात वाहून घेतल्याने बहुजनांच्या, शेतकरी कष्टकऱ्यांच्या घरामध्ये ज्ञानगंगा पोहोचली. संक्रांतीच्या दिवशी मुले उपाशी झोपू नयेत म्हणून या माऊलीने स्वतःच्या सौभाग्याचा अलंकार मोडला. लक्ष्मीबाई यांच्या त्यागातून रयत शिक्षण संस्था उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले.


शिवाजी लंके म्हणाले की, भाऊरावांनी सुरू केलेल्या वसतीगृहात अठरापगड जाती, धर्म व पंथाची मुले शिक्षण घेत होती. लक्ष्मीबाई यांनी आपल्या मुलाप्रमाणे त्यांचा सांभाळ केला. बहुजन समाजातील मुलांच्या जीवनाचे सोने करण्यासाठी त्यांनी शेवटच्या श्‍वासापर्यंत योगदान दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर विद्यार्थ्यांना लक्ष्मीबाईचा त्याग, नम्रता, संयम हे गुण घेण्याचे आवाहन केले.


यावेळी प्राथमिक विद्यालयातील वरद झावरे, यशश्री खराडे, भार्गव रक्ताटे यांनी आपल्या मनोगतामधून लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पालवे, सुजाता दोमल यांनी केले. पी.आर. थोरात यांनी आभार मानले. यावेळी विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *