• Fri. Mar 14th, 2025

सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत गाजला आष्टी रेल्वे आग प्रकरण

ByMirror

Nov 4, 2023

अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचे घोडे अडले कुठे?

बैठकीत रेल्वेच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी)- सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत नवीन आष्टी रेल्वे आग प्रकरण व अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्‍न गाजला. नुकतीच ही बैठक सोलापूर येथे विभागीय रेल्वे प्रबंधक नीरज कुमार दोहरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक एन.के. रनयेवले, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार, वरिष्ठ परिचारक प्रदीप हिरदे, अहमद फैज, डीएसपी दीपक कुमार आझाद, सुदर्शन देशपांडे आदी उपस्थित होते.


सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रशांत मुनोत यांनी बैठकीत नुकतीच अहमदनगर-आष्टी रेल्वेला जी आग लागली त्याची चौकशी करण्याची मागणी केली. यामध्ये रेल्वे विभागाच्या वतीने शॉर्ट सर्किट आणि इलेक्ट्रिकल फॉल्ट मुळे आग लागल्याचे सांगण्यात आले.


तसेच नगरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेल्या अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वे संदर्भात कार्यवाहीची माहिती विचारण्यात आली. त्याला सोलापूर विभागाच्या मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सोलापूर विभागाने इंटरसिटीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव दिला असून, हडपसर आणि पुणे रेल्वे स्थानक येथे गर्दी असल्याने पुणे विभागातून या रेल्वेसाठी अजून हिरवा कंदील मिळाला नसल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.


या बैठकीत नारायणडोह येथील माल धक्क्याची प्रगती, रेल्वे स्थानकावर असलेले अनधिकृत विक्रेते या प्रश्‍नावर चर्चा करण्यात आली. मुनोत यांनी जळालेल्या आष्टी रेल्वेला जेंव्हा आग लागली, तेंव्हा त्यामध्ये अधिकृत प्रवासी नव्हता. प्रवासी नसताना आणि नवीन गाडीला आग कशी लागू शकते? ही मोठी शंका असल्याचे स्पष्ट केले. तर या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याची मागणी केली. रेल्वे सलागार समिती सदस्य गोपाल मणियार यांनी देखील रेल्वे संदर्भातील आणि पॅसेंजर सुविधा संदर्भात प्रश्‍न मांडले. बैठकीला हरजितसिंह वधवा हे देखील उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *