चिमुकल्यांच्या विविध कलागुणांच्या सादरीकरणाने उपस्थित भारावले
विद्यार्थ्यांना स्वच्छंदपणे आपले क्षेत्र निवडून करिअर घडविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे -शिशिरकुमार देशमुख
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार येथील नवीन मराठी शाळा व पूर्व प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध संस्कृतीचे दर्शन घडविले. विविध हिंदी-मराठी गाण्यावर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला होता. चिमुकल्यांच्या विविध कलागुणांच्या सादरीकरणाने उपस्थित पालक भारावले. मोठ्या संख्येने उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली.

नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख व बुऱ्हाणनगरचे केंद्रप्रमुख संजय धामणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्नेहसंमलेनाचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, संस्थेचे सहकार्यवाह गौरव फिरोदिया, माजी महापौर अभिषेक कळमकर, शाळा समितीचे चेअरमन नंदकुमार झंवर, सदस्य संजय सपकाळ, रवींद्र बाकलीवाल, बापूसाहेब शिंदे, भिंगार हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय पडोळे, पर्यवेक्षिका मनिषा गायकवाड, नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या गांगर्डे, पूर्व प्राथमिक वर्गाच्या प्रमुख अर्चना गायकवाड, भिंगार नाईट स्कूलच्या मुख्याध्यापिका विजयश्री वाळूंजकर आदींसह शाळेचे आजी-माजी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. शिशिरकुमार देशमुख यांनी विद्यार्थ्यांना फक्त पारंपारिक शिक्षणाच्या बंधनात न अडकविता, त्यांना आपल्या आवडीप्रमाणे स्वच्छंदपणे आपले क्षेत्र निवडून करिअर घडविण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे सांगितले.
संजय धामणे यांनी स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असते. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विशेष कलागुण दडलेले असतात. ते ओळखून त्या दिशेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात छायाताई फिरोदिया यांनी संस्थेतील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व त्यांच्यामधील कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती गायकवाड, शोभा गायके व कल्याणी धाडगे यांनी केले. आभार शिक्षक प्रतिनिधी शरद कातोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.