तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात दाखल होण्यासाठी मुंबईकडे रवाना
जिल्हाप्रमुख शिंदे व शहरप्रमुख जाधव यांचा मास्टर प्लॅन!
नगर (प्रतिनिधी)- नगर शहर व तालुक्यातील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) प्रमुख नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि संपर्कप्रमुख सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश करण्यासाठी बुधवारी (दि.26 मार्च) मुंबईकडे रवाना झाले. या प्रवेशाने शहर आणि तालुक्यात शिवसेनाला (उद्धव ठाकरे गट) यामुळे मोठा धक्का बसणार असून, शहर नंतर नगर तालुक्यातही शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्राबल्य दिसून येत आहे.
जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हे सर्व पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले. यावेळी बाबुशेठ टायरवाले, दिलीप सातपुते, संभाजी कदम, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. यापूर्वीही शिवसेनेच्या (उद्धव गट) अनेक नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता, मात्र आज होणाऱ्या या मोठ्या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटासाठी संघटन पातळीवर आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
या मोठ्या राजकीय घडामोडींमुळे शहर व तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि शहरप्रमुख सचिन जाधव यांनी राजकीय खेळी करुन पक्षाची ताकत वाढविण्यासह भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन रणनिती आखली आहे. या धक्कादायक प्रवेशामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का बसणार आहे. तालुक्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पुढील राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या प्रमुख नेत्यांची यादी:
संदेश तुकाराम कार्ले (उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य), शरद मधुकर झोडगे (जिल्हा परिषद सदस्य), रामदास रंगनाथ भोर (माजी सभापती, पंचायत समिती), डॉ. दिलीप दत्तात्रय पवार (माजी उपसभापती, पंचायत समिती), गुलाब शिंदे (पंचायत समिती सदस्य), प्रकाश कुलट (उपतालुका प्रमुख), विठ्ठल हंडोरे (सरपंच, घोसपुरी), बाबासाहेब भोर (चेअरमन, भोरवाडी), नवनाथ वायाळ (माजी सरपंच, भोरवाडी), बाबासाहेब टकले (माजी सरपंच, भोयरे पठार), अशोक दहिफळे (उपजिल्हा प्रमुख), सुरेश क्षिरसागर (महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना, महाराष्ट्र उपाध्यक्ष), विठ्ठलराव जाधव (उपशहर प्रमुख), शरदराव शेडाळे (भारतीय कामगार सेना), संजय आव्हाड (वाहतूक सेना).