• Fri. Sep 4th, 2026

Mirrornews24

Marathi News

जुन्या पेन्शनसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एल्गार; काळ्या फितीने आंदोलनाला सुरुवात

ByMirror

Sep 4, 2026
जुन्या पेन्शनसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एल्गार;

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक आक्रमक; 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. मंगळवारपासून (ता. 1 सप्टेंबर) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यास सुरुवात केली आहे. 1 ते 4 सप्टेंबर या कालावधीत काळ्या फिती बांधून नियमित शैक्षणिक कामकाज सुरू ठेवत हे आंदोलन करण्यात येणार आहे.


यानंतर शिक्षक दिनाचे औचित्य साधून 5 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीबाबत शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतला नसल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने मागणीची दखल घेऊन सकारात्मक निर्णय न घेतल्यास 28 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर सहकुटुंब आंदोलन छेडण्यात येईल, तसेच आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव तथा जुन्या पेन्शन योजना समन्वय संघाचे राज्य समन्वयक महेंद्र हिंगे आणि राज्य समन्वयक सुनील भोर यांनी ही माहिती दिली.


1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही विविध आंदोलने, निवेदने आणि मोर्चांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, वारंवार आंदोलने करूनही शासनाकडून या प्रश्‍नावर ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, असा आरोप जुन्या पेन्शन योजना समन्वय संघाने केला आहे. त्यामुळे आता आंदोलनाचा टप्पा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात 1 ते 4 सप्टेंबरदरम्यान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती बांधून शाळांमध्ये नियमित शैक्षणिक कामकाज पार पाडणार आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची काळजी घेत शासनाच्या धोरणाचा निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काळ्या फिती हे शासनाच्या धोरणाविरोधातील निषेधाचे प्रतीक म्हणून वापरण्यात येणार असून, या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


आंदोलनाच्या पुढील टप्प्यात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शिक्षकांचा सन्मान करण्याचा दिवस असतानाच आपल्या न्याय्य हक्कासाठी शिक्षकांना आंदोलन करावे लागत असल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन जुन्या पेन्शन योजनेबाबत ठोस निर्णय घेतला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. 28 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर सहकुटुंब आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर मागणी मान्य होईपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
जुन्या पेन्शन योजना समन्वय संघाचे राज्य समन्वयक महेंद्र हिंगे म्हणाले की, “जुन्या पेन्शन योजनेबाबत शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आता निर्णायक लढा उभारण्यात येणार आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


अहिल्यानगर जिल्ह्यातील या आंदोलनासाठी महेंद्र हिंगे, सुनील भोर, देविदास खेडकर, दिलीप डोंगरे, संजय वाळे, संजय इघे, राज जाधव, सुनील दानवे, संजय भुसारी, राजू पठाण, जाकीर सय्यद, मुकुंद अंचवले, छबुराव फुंदे, बद्रीनाथ शिंदे, सुदाम दळवी, बाबासाहेब शिंदे, भाऊसाहेब शिंदे, अजित वडवकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या आंदोलनाला विविध शिक्षक संघटनांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्याध्यापक संघाचे सुनील पंडित, माध्यमिक शिक्षक संघाचे आप्पासाहेब शिंदे, शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे तसेच शिक्षक भारतीचे आप्पासाहेब जगताप यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *