शाळांना भेटी देऊन करणार संगणक व प्रिंटरचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक व शाळांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे दोन दिवसासाठी नगर शहर व तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहे. सोमवारी (दि.29 जानेवारी) नगर तालुक्यातील व मंगळवारी (दि.30 जानेवारी) विविध माध्यमिक विद्यालयांना भेटी देणार आहेत. तर मंगळवारी संध्याकाळी शाळांना संगणक व प्रिंटरचे वाटप केले जाणार असल्याची माहिती दराडे यांचे स्वीय सहायक हरिष मुंढे व वैभव सांगळे यांनी दिली आहे.
शाळा भेटी दरम्यान शिक्षकांना त्यांचे प्रश्न मांडता येणार आहे. काही प्रश्न समस्या असतील तर योग्य कागदपत्रे घेऊन भेटण्याचे सांगण्यात आले आहे. मंगळवारी संध्याकाळी 5:30 वाजता रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग कार्यलय येथे शहरातील व नगर तालुक्यातील 80 माध्यमिक शाळांना संगणक वाटप होणार आहे. तर 20, 40, 60 टक्के अनुदानीत शाळांना प्रिंटर वाटप होणार आहे. तरी सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.