• Sat. Jul 19th, 2025

शिक्षक आमदार दराडे यांनी जाणून घेतले रात्र शाळेतील शिक्षकांचे प्रश्‍न

ByMirror

Jan 30, 2024

शहरातील भाई सथ्था नाईट हायस्कूलला भेट देऊन साधला शिक्षकांशी संवाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक व शाळांचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी दोन दिवसासाठी नगर शहर व तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी शहरातील भाई सथ्था नाईट हायस्कूलला भेट देवून रात्र शाळेतील शिक्षकांचे प्रश्‍न जाणून घेतले. तर विविध कारणांनी शिक्षणापासून दूरावलेले वंचित व दुर्बल घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करणारे रात्र शाळेतील शिक्षकांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडविण्याचे दराडे यांनी आश्‍वासन दिले.


भाई सथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांनी आमदार दराडे यांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार केला. कोठारी यांनी रात्र शाळेच्या उच्च माध्यमिक विभागात 306, माध्यमिकला 298 विद्यार्थी प्रवेशित असून त्यामध्ये 240 विद्यार्थिनी आहेत. 1952 साली हिंदसेवा मंडळाने शहरातील गोरगरीब, कष्टकरी कुटुंबातील शाळाबाह्य विद्यार्थी व अनेक कारणांनी शिक्षण अर्धवट राहिलेल्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने रात्र शाळेची सोय केल्याचे स्पष्ट करुन रात्र शाळेच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली.


प्राचार्य सुनील सुसरे म्हणाले की, वंचितांच्या शिक्षणाची काळजी घेणारे रात्र शाळेचे शिक्षक शासनाच्या अनेक लाभांपासून वंचित राहिले आहेत. रात्र शाळेतील शिक्षक शाळाबाह्य शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे. या शिक्षकांची वेळ अर्धवेळ म्हणून धरली जात आहे. तर शिक्षकांना घर भाडे, वाहन भत्ता, पेन्शन या प्रकारचे कुठलेही लाभ मिळत नाही. तसेच नगर जिल्ह्यात रात्र शाळेत कला व वाणिज्य शाखा असणारे एकमेव भाई सथ्था महाविद्यालय आहे. उच्च माध्यमिकच्या शैक्षणिक कामकाजाबाबत विभागीय उपसंचालक स्तरावर अनेक समस्या येत आहेत. शैक्षणिक वर्ष 2018-19, 2019-20 मधील घड्याळी तासिका तत्त्वावरील मान्यता प्रस्ताव जमा केलेला असून देखील त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यासोबतच रात्र शाळेच्या शिक्षकांच्या इतरही समस्या सुसरे यांनी यावेळी मांडल्या. तर सदर प्रश्‍न सोडविण्याचे निवेदन दराडे यांना देण्यात आले.


आमदार किशोर दराडे म्हणाले की, दिवस शाळांपेक्षा रात्र शाळा मधील शिक्षकांचे काम कौतुकास्पद असून, वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम रात्र शाळा करत आहे. रात्र शाळा कमी असल्याने त्यांच्या समस्या सोडविणे सोपे आहे. यापुढील काळात रात्र शाळा संदर्भातील समस्याचे निराकरण करण्यासाठी प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वैभव सांगळे, विक्रांत लोंढे, सचिन फिस्के, रवींद्र गावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले. यावेळी रात्र शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *