पार्लरच्या माध्यमातून अनेक महिला-युवतींना मिळवून दिला रोजगार
नगर (प्रतिनिधी)- शहरातील मेकअप आर्टिस्ट सुजाता सचिन देवळालीकर यांना जय युवा स्वयंसेवी संस्थेच्या वतीने यशस्वी उद्योजिका पुरस्काराने गौरविण्यात आले. नुकतेच झालेल्या सावित्री ज्योती महोत्सवात खासदार निलेश लंके यांच्या हस्ते देवळालीकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बी.कॉम. पदवीधर ते ब्युटी थेरपीस्ट, ब्युटी कल्चर, कॉस्मेटॉलॉजिस्ट, ट्रिकोलॉजिस्ट, स्किन ॲस्थेटीक्स एक्स्पर्ट, मेकअप ॲण्ड हेअर आर्टिस्ट होण्यापर्यंतचा टप्पा त्यांनी गाठला आहे. मागील 24 वर्षापासून त्या क्षेत्रात योगदान देत असून, त्या यशस्वी महिला उद्योजिका म्हणून पुढे आल्या आहेत. स्वतःच्या अकॅडमीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग घेऊन मुली व महिलांना त्या स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम करत आहे. गरजू मुलींना विनामूल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार देखील उपलब्ध त्यांनी करुन दिला आहे. ग्रामीण भागांत जाऊनही त्या महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना यशस्वी उद्योजिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सौंदर्य क्षेत्राला आणखी प्रतिष्ठा मिळावी व महिलांना रोजगारांच्या संधी निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहणार असल्याची भावना देवळालीकर यांनी व्यक्त केली. पुरस्काराबद्दल सुवर्णकार समाज संघटना, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ एनजीओ (मँगो) चे अध्यक्ष प्रा. डॉ. रमेश वाघमारे आदींसह समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.